नगर – सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचच्यावतीने  ‘स्वर मिलाप’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्ष आदिनाथ जोशी, शिवप्रसाद जोशी, शरद कुलकर्णी, पुष्पा चितांबर, एस.एन.कुलकर्णी, बलभीम पांडव, मोरेश्वर मुळे आदि उपस्थित होते.

     या ‘स्वर मिलाप’ कार्यक्रमात प्रारंभी स्वराली जाधव हीने प्रारंभी रामपुरी रागातील बात बिते जुगडवार तुम्हारे मिलन की असा सादर केले. तसेच ठुमरी प्रकारातील ‘याद किया की आये हाय राम’ यानंतर ‘राम का गुगान करीये’ हे भजन गायले. जितेंद्र अभिषेकींचा अभंग ‘विष्णूमय जग वैष्णवाचा धर्म’ सादर केला.

     पंडित रामदास कामत यांनी म्हटलेले नाट्यगीत संत सूरदास यांची रचना असलेले ‘दैव किती अविचारी अविचारी’ सादर केले. नंतर ‘घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद’ हे नाट्यपद सादर केले. शोभा गुर्टु यांनी गायलेली गवळण ‘ हात धरुनिया पदराला ओढू नको रे नंदलाल तू’ सुरेख म्हटले. यानंतर ‘श्यामसुंदर श्याम सुंदर मदन मोहन जागो मेरे लाल’ ही भैरवी सादर करुन कार्यक्रमाची सांगता झाली. हार्मोनियमवर रमेश जाधव, तबल्यावर शेखर दरवडे, तालवाद्य अनुज दरवडे यांनी साथ दिली.

     अत्यंत सुस्पष्ट उच्चार, खणखणित आवाज, स्वरांचे आलाप सुरेख चेहर्‍यावरील सत्विक भाव मनासून समजून घेऊन अभंग म्हणारे स्वराली पारनेर तालुक्यातील ढवळपुरी या खेडेगावात इ.8 वीत शिकत आहे. तिची संगितातील मध्यमा परिक्षा झाली असून, तिला गुरु आर.एन.भनगाडे पुढील संगीत शिक्षण देत आहेत.

     याप्रसंगी अध्यक्ष आदिनाथ जोशी म्हणाले, ज्येष्ठ नागरिक मंचच्यावतीने सभासदांसाठी विविध उपक्रम राबवित असते. ज्येष्ठांची आरोग्य तपासणी, सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रमातून ज्येष्ठांचे जीवन आनंदी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.

     या कार्यक्रमास सर्वोत्तम क्षीरसागर, श्रीराम तांबोळी, चंद्रकांत पंडित, स्वामी बिळसकर आदिंसह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवी कुलकर्णी यांनी केले तर शरद कुलकर्णी यांनी आभार मानले.