अहमदनगर (प्रतिनिधी) : आनंदऋषीजी हॉस्पिटलचा आदर्श इतर हॉस्पिटलनेही समोर ठेवल्यास असंख्य रूग्णांना दिलासा मिळेल. हॉस्पिटलच्या कार्यास सरकारचेही आवश्यक ते सहकार्य व मदत मिळवून देण्याची ग्वाही विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.

राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या ३१ व्या पुण्यस्मरणानिमित्त जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटल अ‍ॅण्ड हार्ट सर्जरी सेंटर येथे दि.७ मार्च ते दि. ३० मार्च २०२३ या कालावधीत विविध मोफत आरेोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी मेंदूविकार व मेंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.

डॉ. आशिष भंडारी यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना हॉस्पिटल फिरवून दाखवत संपूर्ण माहिती दिली. प्रास्ताविकात डॉ. प्रकाश कांकरिया यांनी सांगितले की, राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांची मानवसेवेची शिकवण व प्रबुध्द विचारक प.पू.आदर्शऋषीजी म.सा.यांच्या प्रेरणेतून हे शिबिर घेण्यात येत आहेत. दरवर्षी राबविण्यात येणार्‍या या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ असंख्य रूग्णांना झाला आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटलला एन.ए.बी.एच.मान्यता मिळालेली असून ही मान्यता असलेले नगर जिल्ह्यातील २६० बेडस्चे हे पहिलेच हॉस्पिटल आहे.

हॉस्पिटलमध्ये प्रशस्त व अतिप्रगत पॅथॉलॉजी विभाग, आंतरराष्ट्रीय दर्जाची ब्लड बँक, ३४ डायलेसिस मशिन कक्ष, परिपूर्ण फिजिओथेरपी विभाग आहे. आमदार संग्राम जगताप म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या कार्याशी जवळून परिचय आहे. जैन सोशल फेडरेशनचे मानवसेवेचे कार्य आणि त्याला अनुभवी तज्ज्ञ डॉटरांची साथ असल्याने सर्वसामान्य रुग्णांना येथे मोठा दिलासा मिळत असतो. सेवाभाव म्हणजे नेमके काय याची प्रचिती येथे येते. हॉस्पिटलच्या कार्यास भविष्यातही सहकार्य कायम राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. सविता रमेश फिरोदिया म्हणाल्या की, आपल्या देणगीतून सर्वसामान्यांना चांगली आरोग्य सेवा मिळते याचा मनस्वी आनंद होत असतो हॉस्पिटलच्या कार्यास हातभार लावताना मानवसेवेच्या कार्यात सहभागी होता येते.

शिबिरांच्या उपक्रमातून असंख्य रूग्णांना चांगला लाभ होईल असा विश्वास आहे. शिबिरात डोकेदुखी, अपस्मार, पॅरालिसिस, कंबरदुखी, नसांचे विकार, स्नायूंचे विकार, मेंदूतील जंतुसंसर्ग, मेंदूज्वर, स्मृतीभ्रंश इत्यादी आजारांची तपासणी व उपचार मार्गदर्शन करण्यात आले. मणयातील चकती सरकणे, झटके येणे इत्यादीवर उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातील. ईईजी, ईएमजी तपासण्या ५० टक्के सवलतीच्या दरात केल्या जाणार आहेत. सुमारे ८० रूग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. आभार संतोष बोथरा यांनी मानले.

रमेश फिरोदिया एज्युकेशन संस्थेच्या सहकार्याने आयोजित या शिबिरावेळी आमदार संग्राम जगताप, माजी आमदार राहुल जगताप, उपमहापौर गणेश भोसले, घनश्याम शेलार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, बाळासाहेब नाहाटा, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, अभिजीत खोसे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, अविनाश घुले, डॉ. विजय भंडारी, आयोजक सविता रमेश फिरोदिया, सी.ए. रमेश फिरोदिया, जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा, डॉ. प्रकाश कांकरिया, सतीश लोढा, प्रकाश छल्लानी, माणकचंद कटारिया, डॉ.्आशिष भंडारी, मेंदू विकार तज्ज्ञ डॉ. गौतम कराळे, न्यूरोसर्जन डॉ.शैलेंद्र मरकड आदी उपस्थित होते.