अहमदनगर : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी ज्याप्रमाणे सेना-राष्ट्रवादी यांचं जमलेलं दिसत आणि काँग्रेसची कुरबुर सारखी सारखी बाहेर दिसत असते आणि या नाराजगीचा “सूर नवा ध्यास नवा” जणू याप्रमाणे नेहमी महाराष्ट्राची सत्ताकारण चर्चेत असते आज अहमदनगर महापौर निवडणुकीचे वाजलेले बिगुल यामध्येही महाविकास आघाडी मध्ये सेनेचे राष्ट्रवादीशी एकत्र सूत्र जुळलेले मिळाले आणि काँग्रेस एकाकी राहिल्याचे सध्या तरी दिसत आहे.

अहमदनगर महापालिकेच्या महापौर- उपमहापौर पदासाठी 30 जून रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी अर्ज वाटपास सुरुवात झाली असून सोमवारी पहिल्याच दिवशी शिवसेनेच्या नगरसेविका रोहिणी संजय शेंडगे यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान काँग्रेसच्या शीला दीप चव्हाण यांनी महापौर व उपमहापौरपदासाठी अर्ज नेले आहेत. राष्ट्रवादीकडून उपमहापौरपदासाठी अर्ज अद्याप घेतलेला नाही. 

शिवसेनेच्या उमेदवार रोहिणी शेंडगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आमदार संग्राम जगताप, संपर्क प्रमुख भाऊ कोरगांवकर, जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, माजी महापौर सुरेखा कदम, भगवान फुलसौंदर, शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक गणेश भोसले यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. अर्ज भरण्याची शेवटची मुदत मंगळवार दि.29 जून रोजी दुपारी दीड पर्यंत आहे.

उद्या शेवटचा दिवस असल्याने आणखी किती अर्ज येतात आणि शेवटी किती उमेदवार राहतात याकडे सर्वच अहमदनगरकरांचे लक्ष लागले आहे.