शाहू महाराज जयंती काँग्रेसच्यावतीने उत्साहात संपन्न 

अहमदनगर : राजश्री शाहू महाराज यांनी समाजामध्ये शिक्षणाच्या प्रसाराचे काम केले. त्या काळी त्यांनी आपल्या संस्थानाच्या कार्यक्षेत्रामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे करत ते मोफत उपलब्ध करून देण्याचे काम केले. राजश्री शाहू महाराज हे सुधारणावादी समाजसुधारक होते, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांनी केले आहे. 

शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस कार्यालयामध्ये जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी काळे कार्यकर्त्यांना संबोधित करताना बोलत होते. यावेळी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून काँग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले. 

यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा,  उपाध्यक्ष खलील सय्यद, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी कॉंग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, काँग्रेस नेते फारुक शेख, क्रीडा शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख,  इंटक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हनिफ शेख, विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र ठोंबरे, विद्यार्थी नगर तालुकाध्यक्ष सुजित जगताप, शहर जिल्हा सचिव अन्वर सय्यद, सचिव प्रशांत वाघ, सागरदादा काळे, माजी नगरसेविका जरीना पठाण, शहर जिल्हा सरचिटणीस नलिनी गायकवाड, सेवादल महिला शहर जिल्हाध्यक्ष कौसर खान, उषाताई भगत, कल्पना खंडागळे, सेवादल काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष डॉ.मनोज लोंढे, ऋतिक लद्दे, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष योगेश दिवाने, आसाराम पालवे, राहुल गांधी विचार मंचचे सागर ईरमल, सचिव ॲड. सुरेश सोरटे, सहसचिव शंकर आव्हाड, युवक काँग्रेस उपाध्यक्ष प्रशांत ठोंबरे, शरीफ सय्यद, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मोसिम शेख, इम्रान बागवान, अजय मिसाळ, विशाल घोलप, अक्षय पाचरणे आदी उपस्थित होते.

किरण काळे यावेळी बोलताना म्हणाले की, शाहू महाराजांनी स्त्री शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी पुढाकार घेतला. त्या काळात अस्पृश्यांचा वेगळ्या शाळा भरविल्या जात होत्या. ही अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी अशा शाळाच भरवायची पद्धत त्यांनी त्याकाळी बंद केली. अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी या घटकाला नोकरीत आरक्षण देण्याचे काम केले. शाळा, दवाखाने या ठिकाणी देखील या घटकाला समानतेची वागणूक मिळेल यासाठी शाहू महाराजांनी पुढाकार घेतला. 

त्याकाळी बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेतले जात नव्हते. ते घेतले जावे यासाठी त्यांनी पुढाकार घेत डेक्कन रयत असोसिएशनची स्थापना करून त्या माध्यमातून अमुलाग्र निर्णय राबविण्याचे काम केले. शेती विषयी असणारा त्यांचा दृष्टिकोन हा दूरदृष्टी असणारा होता. धरणांची उभारणी करणे, त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन देणे या उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी कृषी विकासाची मुहूर्तमेढ रोवली, असे किरण काळे यावेळी बोलताना म्हणाले.