अहमदनगर : आज जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी अचानक पणे तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गायकवाड यांची तडकाफडकी बदली करून त्यांना नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) मध्ये पाठवले आहे, त्यांच्या जागी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांची नियुक्ती केली आहे.

निरीक्षक गडकरी यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागामध्ये चांगल्या पद्धतीने कारभार केलेला आहे. नगर जिल्ह्यातील नगर अर्बन व शहर सहकारी बँक घोटाळा, पतसंस्था घोटाळा, प्रकरणांमध्ये विशेष तपास करून आरोपींना जेरबंद करण्यामध्ये त्यांचे योगदान आहे. तसेच अनेक प्रलंबित गुन्ह्यांचा तपास त्यांनी करून आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागांमध्ये चांगल्या पद्धतीने काम  केलेले आहे.

या अगोदर त्यांनी पुणे येथील सिंहगड रोड परिसरातील पोलिस ठाण्यामध्ये पोलिस निरीक्षक म्हणून कारभार चांगल्या पद्धतीने हाताळला आहे. आज गडकरी यांनी तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदाच्या कार्यभार घेतला आहे.

तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड हे आठ महिन्यापूर्वी तोफखाना ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत झाले होते. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायाला आळा बसवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच तोफखाना हद्दीमध्ये असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सुद्धा वरिष्ठांना पाठवला होता. तरीही गायकवाड यांची नगरच्या कंट्रोल रूम मध्ये बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले आहे.