अहमदनगर : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास.. या विश्वासाला मी तडा जावू देणार नाही” अहमदनगर महापालिकेच्या नवनिवाचित महापौर रोहिणी शेंडगे यांनी व्यक्त केलेली भावना याचबरोबर महानगरपालिकेतील प्रशासकीय अधिकारी कर्मचार्‍यांना शिस्त लावण्यात येईल हा उपमहापौर गणेश भोसले यांनी दिलेला इशारा अहमदनगर पालिकेवर महाविकास आघाडीचाच झेंडा फडकल्याची ग्वाही देत असतानाच राष्ट्रवादी व शिवसेना नेते शिवसैनिक, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला.

आज सकाळीच पीठासीन अधिकारी राजेंद्र भोसले यांनी महापौर, उपमहापौर पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे व उपमहापौर पदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांची निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली नी महानगरपालिकेच्या बाहेर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला.

शहरातील प्रलंबित विकास कामे पूर्ण करण्याचा मानस नव्या महापौर रोहिणी शेंडगे यांनी तर शहराला हरित नगर करण्याचा संकल्प नवे उपमहापौर गणेश भोसले यांनी व्यक्त केला. महापालिकेच्या नव्या महापौरपदी रोहिणी शेंडगे व उपमहापौरपदी गणेश भोसले यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही भावना व्यक्त केली.

महापौर शेंडगे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या सर्व नेत्यांचे, नगरसेवकांचे आभार मानले. उपमहापौर भोसले यांनीही दोन्ही आमदारांसह नगरसेवकांचे आभार व्यक्त करून शहरात विकासाची रखडलेली कामे मार्गी लावण्याचा मानस व्यक्त केला आहे. याशिवाय पाणी योजनेची कामे हाही भोसले यांच्या जीव्हाळ्याचा विषय आहे. तसेच महापालिकेतील अधिकार्‍यांना शिस्तही लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.