नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टेक्नोलॉजी कंपनी मायक्रोसॉफ्टने विंडोज 11 ऑपरेटिंग सिस्टमची नुकतीच घोषणा केली. विंडोज 11 लवकरच युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. मायक्रोसॉफ्टने Windows 10 नंतर सुमारे 6 वर्षांनी Windows 11 ची घोषणा केली आहे. मायक्रोसॉफ्टने या नव्या विंडोजमध्ये स्टार्ट मेन्यूचा नवा लूक, नवं डिझाईन असलेलं मायक्रोसॉफ्ट स्टोअर, अँड्रॉईड अॅप्स आणि क्लिन युजर इंटरफेस अशा विविध नव्या फीचर्सचा समावेश केला आहे.Windows 11 हे पहिल्यापेक्षा अधिक रिफ्रेशिंग असून ज्यावेळी हे उपलब्ध होईल तेव्हा लॅपटॉप, पीसी आणि इतर उपकरणांमध्ये त्याचा वापर सुरु होईल. जे युजर्स Windows 11 चं अधिकृत लॉन्चिंग होईपर्यंत थांबू इच्छित नाहीत, ते मायक्रोसॉफ्टच्या विंडोज इनसाईडर प्रोग्रोमशी संलग्न होऊ शकतात आणि त्या माध्यमातून पुढील आठवड्यापासून विंडोज 11 चा वापर करु शकतात.

विंडोज इनसाइडर प्रोग्राम म्हणजे काय?

Windows Insider Program हा कंपनीचा एक टेस्टिंग प्रोग्राम आहे. या माध्यमातून कोणताही युजर या विंडोज 11ची टेस्टींग करुन कंपनीला फिडबॅक देऊ शकतात. यामुळे मायक्रोसॉफ्टला विंडोज 11 मध्ये सुधारणा करणं शक्य होणार आहे. या विंडोज इनसाइडर प्रोग्रोमशी संलग्न होण्यासाठी युजरला सर्वप्रथम नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. त्यानंतर युजर विंडोज 11 डाऊनलोड करु शकणार आहेत. विंडोज 11 अजून टेस्टिंगच्या (Testing) टप्प्यात आहे. त्यामुळे युजरने ज्या पीसी किंवा लॅपटॉपमध्ये महत्वपूर्ण डेटा नाही, अशाच पीसी किंवा लॅपटॉपमध्ये विंडोज 11 डाऊनलोड करावं.

विंडोज इनसाइडर प्रोग्रामशी कसं कनेक्ट व्हाल?

– विंडोज इनसाइडर प्रोग्रोमशी कनेक्ट होणं सोपं आहे. यासाठी युजरला आपल्या लॅपटॉप किंवा पीसीवर Windows Insider ही वेबसाईट सुरु करावी लागेल.

– त्यानंतर युजरला इथे रजिस्टर करावं लागेल. त्यानंतर मायक्रोसॉफ्टने लॉगइन करण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शन सूचनांचं पालन करावं. विंडोज 10 वापरणारे युजर या प्रोग्रामशी थेट कनेक्ट होऊ शकतात. यासाठी युजरला कम्प्युटरवरील सेटिंगमध्ये जावं लागेल. त्यानंतर युजरला

– Update And Security या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर येथे Windows Insider सुरु होईल आणि युजर याच्याशी कनेक्ट होऊ शकतील.

Windows 11 कसं डाऊनलोड करणार?

विंडोज इनसाइडर प्रोग्रामशी कनेक्ट झालेल्या युजरसाठी विंडोज 11 प्रिव्ह्यु पुढील आठवड्यात सुरु होणार आहे. येथूनच युजरला विंडोज 11 डाऊनलोड करता येणार आहे. विंडोज 11 रन होण्यासाठी लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर काही फीचर्स उपलब्ध असणं आवश्यक आहे.

यासाठी पीसी किंवा लॅपटॉपवर 64 बीट प्रोसेसर, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज या किमान स्पेसिफिकेशन उपलब्ध असणं आवश्यक आहे.