निवडणूक प्रक्रियेत शेंडगे व भोसले यांच्या नावाच्या अधिकृत घोषणेची औपचारिकता राहिली

अहमदनगर : अहमदनगर मनपा महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या हालचाली सुरु असतांना महानगर पालिकेत वातावरण चांगलेच रंगले होते आता बाकी राहिली ती अधिकृत घोषणा महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे व उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. या दोन उमेदवारांच्या विरोधात कोणीही उमेदवारी अर्ज भरले नाहीत. त्यामुळे बुधवारी (30 जून) या दोन्ही पदांसाठी होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत शेंडगे व भोसले यांच्या नावाच्या अधिकृत घोषणेची औपचारिकता राहिली आहे.महापौरपदासाठी शिवसेना उमेदवार रोहिणी शेंडगे यांचा अर्ज सोमवारी (28 जून) दाखल झाला आहे.

त्यानंतर उपमहापौर पदाच्या निवडणुकीत करता मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गणेश भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, महापौर व उपमहापौर पदाकरता प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे महानगरपालिकेची निवडणूक बिनविरोध झाली आहे.

महानगरपालिकेच्या स्थापनेपासून ही तिसरी बिनविरोध निवडणूक आहे. याआधी 2012 मध्ये शिवसेनेच्या शीला शिंदे यांच्या विरोधात काँग्रेसच्या सूवर्णा कोतकर यांनी दाखल केलेला अर्ज मतदानाआधी मागे घेतल्याने शिंदे बिनविरोध महापौर झाल्या, तर 2016 मध्ये शिवसेनेच्या सुरेखा कदम यांच्या विरोधात अर्ज दाखल केलेल्या भाजप उमेदवार नंदा साठे यांनी माघार घेतल्याने कदम बिनविरोध महापौर झाल्या.

17 वर्षात चार वेळा महापौरपद

नगर महानगरपालिकेची स्थापना 2003 साली झाली. प्रथम महापौर होण्याचा मान शिवसेनेचे भगवान फुलसौदर यांना 2004 मध्ये मिळाला. त्यानंतर 2011 मध्ये शिवसेनेच्या शीला शिंदे, तर 2016 मध्ये सुरेखा कदम महापौर झाल्या. आता रोहिणी शेंडगे यांना हा मान मिळाला आहे.

विरोधकांकडे उमेदवारच नाही

महापालिकेचे यंदाचे महापौरपद अनुसूचित जाती महिला प्रवर्ग यासाठी राखीव होते. या प्रवर्गाच्या शिवसेनेकडे तीन तर राष्ट्रवादी व काँग्रेसकडे प्रत्येकी एक नगरसेविका आहे. भाजपकडे या प्रवर्गातील नगरसेविका नाही. त्यामुळे महानगरमालिकेच्या महापौरपदाच्या इतिहासामध्ये विरोधकांकडून एकही अर्ज दाखल न होण्याची ही पहिलीच वेळ आहे.