
जनतेला तयारीसाठी किमान तीन दिवसांचा वेळ द्यावा : निलम गोऱ्हे
मुंबई ११ एप्रिल २०२१ : राज्यात थैमान माजवणारी कोरोनाची भयंकरलाट रोखण्यासाठी आणि चेन तोडण्यासाठी कमीतकमी 14 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुरु असलेल्या कोरोना टास्क फोर्सच्या बैठकीत सदस्यांनी देखील 14 दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा असल्याचे म्हटले आहे. यावर आता शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठविले आहे.
या पत्रामध्ये गोऱ्हे यांनी राज्यात लॉकडाऊन करायचा असेल तर जनतेला तयारीसाठी किमान तीन दिवसांचा वेळ द्यावा. जेणेकरून गरजेच्या वस्तू घेण्यासाठी लोकांची गर्दी उसळणार नाही आणि लॉकडाऊनचा उद्देशही सफल होईल. तसेच बाराबलुतेदार, ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्यासाठी राज्य सरकारने काहीतरी सोय करावी. तीन दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये ज्यांना त्यांच्या घरी जायचे आहे त्यांची सोय करावी, त्यांना सूट द्यावी अशी मागणी केली आहे.
राज्यात किती दिवसांचा लॉकडाऊन करायचा यावर कोरोना टास्क फोर्ससोबत मुख्यमंत्र्यांची खलबते अजूनही सुरु आहेत. यामध्ये मुख्यमंत्री ८ दिवसांचा लॉकडाऊन करण्याचे म्हणत आहेत. तर टास्क फोर्सचे सदस्य 15 दिवसांच्या लॉकडाऊनच्या मताचे आहेत. यावर सविस्तर चर्चा करून आज किंवा उद्या निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
या आठवड्यात गुढी पाडवा,पवित्र रमझानचा महिना आणि आंबेडकर जयंती आहे. यानंतर शुक्रवारपासून सध्या सुरु असलेला विकेंड लॉकडाऊन आहे. गुढी पाडव्याला किंवा शुक्रवारपासून 8 किंवा 14 दिवसांचा कडक ल़ॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. असे झाल्यास लोकांना तयारीसाठी पुरेसा अवधी मिळणार आहे.