मुंबई | राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अटकेत असणाऱ्या निलंबित पोलिस निरीक्षक सचिन वाझे याच्या अडचणीत आणखी वाढ होत असताना दिसत आहे मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं ठेवल्या प्रकरणी अटक झाल्यानंतर आता तपास यंत्रणा तपास करत असताना अनेक गोष्टींचे पुरावे त्यांच्या हाती लागत असल्याचं गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. याच दरम्यान आता आणखी एका घोटाळ्यात सचिन वाझेचं नाव असल्याची माहिती समोर येत आहे.

‘बीएआरसी’ म्हणजेच ‘बार्क’ कडून टीआरपी प्रकरणात सचिन वाझे याने गुन्हे शाखेच्या एका पोलिस निरीक्षकाच्या मदतीने 30 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणातील वृत्त नुकतेच एका वृत्तसंस्थेने प्रकाशित केले आहे. टीआरपी घोटाळ्याचा तपास करत असताना कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्रास न देण्याच्या अटीखाली सचिन वाझेने 30 लाख रुपये लाच घेतल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

या सर्व प्रकरणात सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडी सखोल चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता सचिन वाझेच्या अडचणीत आणखी भर पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.या सर्व प्रकरणात भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करून सचिन वाझेची टोळी टीआरपी घोटाळ्यात सामील असल्याचा दावा मागच्या महिन्यात 15 मार्च 2021 ला केला होता.