
अहमदनगर (दि २ डिसेंबर २०२०) : एखाद्या शहराची ओळख तेथील सोयी सुविधा, रचनात्मक कामे,स्वच्छता, सुशोभिकरणाबरोबरच तेथील धार्मिक स्थळांमुळे शहराच्या वैभवात भर पडत असते. नगर शहराचे ग्रामदैवत असलेले श्री विशाल गणेश मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे.मंदिराचा झालेला जिर्णोद्धार हा कौतुकास्पद असाच आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद होती आता ती सुरु झाली आहेत. त्यामुळे धार्मिक स्थळांची व्यवस्था व सुविधांही चांगल्या पद्धतीची असणे गरजचे आहे.श्रीविशाल गणेश मंदिराच्यावतीने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येत असलेले उपक्रम समाधानकारक आहेत, असे प्रतिपादन मनपाचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी केले.शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरास मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी भेट दिली असता, त्यांच्या हस्ते सपत्नीक आरती करण्यात आली. याप्रसंगी पंडितरावखरपुडे यांनी मंदिराच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्याचबरोबरच मंदिरे खुली झाल्यानंतर शासनाच्यावतीने निर्देशित करण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे,त्याच बरोबर भाविकांना मास्क,सॅनिटायझर, सोशल डिस्टसिंगच्या सूचना देऊन त्यासाठी स्वतंत्र्य व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगितले. देवस्थानचे सचिव अशोकराव कानडे यांनी जिर्णोद्धाराच्या कामाची माहिती दिली. यावेळी देवस्थानाच्यावतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
