अहमदनगर (दि २ डिसेंबर २०२०) : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. रेखा जरे यांच्या मारेकर्‍यांचा शोध लावण्यात आणि त्यांना अटक करण्यात अहमदनगर पोलिसांना यश आलं आहे. सुपारी देऊनच सौ. रेखा जरे यांचा खून करण्यात आल्याचं उघड झालं आहे. अवघ्या चोवीस तासात मारेकर्‍यांना जेरबंद करण्यात नगरच्या पोलिसांना यश आले असून शनेश्‍वर उर्फ गुड्डू शिंदे (कोल्हार) आणि फिरोज शेख (श्रीरामपूर) या दोन्ही मारेकर्‍यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

या दोघांना सुपारी देणार्‍या तिसर्‍या आरोपीस म्हणजेच आदित्य चोळके (राहुरी) याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. चोळके याच्याकडून सागर भिंगारदिवे हे नाव पुढे आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या सौ. रेखा जरे यांचा पुणेहून अहमदनगरला येत असताना सोमवारी रात्री आठच्या सुमारास जातेगाव घाटात खून करण्यात आला होता.

त्या स्वत: चारचाकी वाहन चालवत होत्या. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांची गाडी घाटात अडवली. शाब्दिक चकमकीचे नाटक झाले. या दरम्यान एक मारेकरी त्यांच्या गाडीसमोर आडवा उभा राहिला आणि दुसर्‍याने जरे यांच्यावर चाकूने वार केले. त्यांच्या गळ्याला मोठी जखम झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता.सदरची घटना ही गाडीला कट मारला या किरकोळ कारणातून घडल्याची चर्चा झडत होती. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सदर घटनेबाबत स्वत: लक्ष घातले.विविध अंगांनी तपासाची यंत्रणा हलवली.सौ.रेखा जरे यांच्या संपर्कात असणार्‍यांचा शोध घेतला.

स्थानिक गुन्हे शाखेसह तीन पोलिस ठाण्यांची पथके तयार करण्यात आली. गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांच्या टीमला आरोपी पकडण्यात यश आलय. सौ. रेखा जरे यांची हत्या करणारे दोन्ही आरोपी म्हणजेच शनेश्‍वर उर्फ गुड्डू शिंदे आणि फिरोज शेख यांना राहाता तालुक्यातील कोल्हार येथून ताब्यात घेण्यात आले आहे. या दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. सुपारी घेऊन खून करण्यात आल्याची कबुली त्यांनी दिलीय. दोघांच्याही मुसक्या गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके व त्यांच्या टीमने आवळल्या आहेत.कोल्हार येथून दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना ही सुपारी चोळके याने दिल्याचे समोर आले.

पोलिसांनी लागलीच चोळके यास अटक केली. चोळके याने त्यास ही सुपारी केडगावमधील सागर भिंगारदिवे याने दिल्याचे सांगितले.भिंगारदिवे याला अहमदनगर शहरातून सुपारी देण्यात आल्याचे बोलले जाते. पोलिसांना त्याने नाव सांगितले असले तरी याबाबत अधिकृत माहिती पोलिसांकडून मिळालेली नाही. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या विश्‍वासातील खास पथक जरे यांच्या संपर्कात असणार्‍यांचे डिटेल्स मिळवत आहेत.