पाटणा (दि १६ नोव्हेंबर २०२०) : सर्वात आधी ३ मार्च २००० मध्ये नितीशकुमार मुख्यमंत्री बनले होते. मात्र,बहुमताअभावी त्यांचे सरकार सात दिवसांत कोसळले.नितीश कुमार २४ नोव्हेंबर २००५ मध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. त्यानंतर ते २४ नोव्हेंबर २०१० पर्यंत मुख्यमंत्री म्हणून राहिले.

२६ नोव्हेंबर २०१० मध्ये ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. मात्र, कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी घेत त्यांनी राजीनामा दिला. त्यावेळी जीतन राम मांझी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार दिला होता. २२ फेब्रुवारी २०१५मध्ये चौथ्यांदा त्यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.

त्यानंतर २०१५ मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या जेडीयू आणि लालू यादव यांच्या आरजेडीमध्ये महागठबंधन झाले. महागठबंधनने निवडणुकीत बाजी मारली. २० नोव्हेंबर २०१५ मध्ये नितीश कुमार पाचव्यांदा मुख्यमंत्री बनले. या सरकारमध्ये तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री बनले.

त्यानंतर दीड वर्षांनी नितीश कुमार यांनी आरजेडी सोबतची आघाडी तोडली. त्यानंतर त्यांनी भाजपला सोबत घेऊन सरकार स्थापन केले. २७ जुलै २०१७ मध्ये नितीशकुमार सहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले आणि आता ते सातव्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.