अहमदनगर (दि २१ मे २०२१) : अहमदनगर शहरातील लसीकरण मोहीम दोन दिवस बंद राहणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी दिली. लसींचा साठा उपलब्ध नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. अहमदनगर शहरात विविध केंद्रांवर लसीकरण मोहीम हाती घेतली जात आहे. मात्र लसींचा साठा त्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने अनेकदा या मोहिमेत अडथळा निर्माण होतो.

सध्याही लस उपलब्ध नसल्याने शनिवारपर्यंत लसीकरण पूर्णतः बंद ठेवण्यात आल्याचे आयुक्त गोरे यांनी सांगितले. तसेच लसीकरण केंद्रावर टोकन सिस्टीम, नावे जाहीर करणे आदी अवलंबले तरीही अद्याप नागरिक गर्दी करण्याचे कमी करत नाहीत. या गर्दीचा फटका नागरिकांनाच बसत आहे.

यातून कोरोना फैलावण्याचा धोका आहे. तसेच विनाकारण नागरिकांना हेलपाटा पडत आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी आणखी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. या दोन दिवसात त्याचे नियोजन केले जाईल. त्याच प्रमाणे लस ज्या प्रमाणात उपलब्ध होतील, त्यानुसार लसीकरण सोमवारपासून सुरू करायचे की कधी हे ठरविण्यात येईल. त्यानुसार नागरिकांना माहिती देण्यात येईल, असेही आयुक्त गोरे यांनी सांगितले. 

केंद्र सरकारने तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कोविशिल्डच्या दोन लसीमधील अंतर वाढविले आहे. सुरूवातीला हे अंतर 28 दिवसांचे होते. त्यानंतर ते 40 दिवसांचे करण्यात आले. आता ते 82 दिवसांचे करण्यात आले आहे. लस उपलब्ध होत नसल्यामुळेच हे अंतर वाढविले जात असल्याचा संशय नागरिकांना आहे. त्यामुळे कोविशिल्ड ऐवजी कोव्हॅक्सिन घेण्याकडे कल वाढला आहे.