श्रीरामपूर (प्रतिनिधी)- सध्या सर्वत्रच कोरोनाने हाहाकार माजविला आहे त्यात कडक लॉकडाऊन करण्यात आल्याने गोर-गरीब उपेक्षित आणि लघु व्यावसायीकांची उपासमार सुरु झाली आहे,शासनाने पाच किलो अन्नधान्य जरी मोफत दिले असले तरी ते परीवारास पुरेसे इतके नाही, लघु व्यावसायीकांच्या जवळ जे काही व्यावसायीक भांडवल अथवा जमा पुंजी होती ती पुर्णत: खर्च झाली आहे, उसनवारीवर प्रपंचाचा गाडा हाकताना सर्वसामान्यांचे नाकी नऊ येत आहेत,

अशातच घर भाडे/दुकान भाडे घेण्यासाठी घर/दुकान मालकांचे तगाद्यावर तगादे सुरु झाले आहेत,पहीलेच पोटाची खळगी भरण्यासाठी पुरेसे अन्न मिळेनासे झाले असल्याने घर/दुकान भाडे देणार कसे ?, असा गंभीर प्रश्न एखाद्या राक्षसाप्रमाणे पुढे उभा ठाकला आहे,एकीकडे कोरोना,दुसरीकडे उपजिविका तर तीसरीकडे घर/दुकान भाडे अशा त्रिवेणी कटू प्रसंगात सर्वसामान्य लघु व्यावसायिक पुर्णत:भरडला जात आहे, यासाठी किमान लॉकडाऊन काळात तरी लघु व्यावसायीकांचे घर/दुकान भाडे माफ करण्याचे मा.मुख्यमंत्री महोदयांनी आदेश द्यावेत अशी मागणी समाजवादी पार्टीचे अहमदनगर (उत्तर) जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे,

आस्मानी आणि सुलतानी संकटाच्या खाईत सापडलेल्या बळीराजाच्या जशा मागे आत्महत्या घडत होत्या आणि सध्याही घडत आहेत,त्याप्रमाणेच आता यापुढे छोट्या व्यावसायिकांच्या आत्महत्या घडणार असल्याचे जाणवत आहे,ही मोठी चिंतेची बाब निर्माण झाली आहे,याकरीता मा.मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ लघु व्यावसायीकांना दिलासा देण्यासाठी त्यांचे घर/दुकान भाडे माफीचा तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा समाजवादी पार्टीच्या वतीने आंदोलनाचा पावित्रा हाती घेणे भाग पडेल असेही या निवेदनात म्हटले आहे,

मागच्या लॉकडाऊनमध्ये घर/दुकान भाडे माफीचा आदेश आपण दिला होता त्यांचा भाडेकरुना मोठा आधार मिळाला होता यावेळी देखील तसाच आदेश देऊन भाडेकरुंना घर/दुकान मालकांच्या त्रासातून मुक्ती द्यावी,तथा जर कोणी घर/दुकान मालक तरीही ऐकत नसेल आणि तगादा करतच असेलतर पोलिसांकरवी त्यावर योग्य कारवाई करण्याचे आदेशही देण्यात यावेत असेही शेवटी या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या निवेदनात जोएफ जमादार, आसिफ तांबोळी, गुडडू जमादार, अनवर तांबोळी, दानिश पठाण, अरबाज कुरैशी, मुबसशिर पठाण, जकरिया सैय्यद, अमन शेख, साद पठाण, अय्यूब पठाण, अल्तमश शेख, शाहिद शेख, फैजान काजी,मोसीन कुरैशी,आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.