
पुणे- पुण्यात आता पूर्वीसारखी परिस्थिती नाही मुंबई उच्च न्यायालयात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या जुनी सादर करण्यात आली असावी. म्हणूनच या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीती निर्माण होऊ नये, या उद्देशाने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. तसेच,पुण्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता नसल्याची भूमिका महापौर मोहोळ यांनी घेतली आहे.पुण्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्याच्या सूचना उच्च न्यायालयाने दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापौर मोहोळ यांनी ही भूमिका मांडली.
मोहोळ म्हणाले, ‘शहारातील कोरोनाबाधित रूग्णांची आकडेवारी जी उच्च न्यायलयात सादर करण्यात आली आहे ती सध्याची असू शकत नाही. कारण गेल्या दोन आठवड्यांत शहरातील परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. मागील पंधरा दिवसांत शहरात चांगली परिस्थिती पाहण्यास मिळत असून, सक्रिय रुग्णांची संख्या जवळपास 16 हजारांनी कमी झाली आहे.तर मृत्यूदरदेखील तुलनेने खाली आला आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या माध्यमातून शहरात 7 ऑक्सीजन प्लांट उभारण्यात येत आहेत.
शहरातील रूग्णसंख्या आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र त्याचदरम्यान शहरात 1 लाख आणि मुंबईत 53 हजारांच्या आसपास रूग्णसंख्या असल्याचे पुढे आले आहे. ही आकडेवारी जिल्ह्याची असेल, शहरात जवळपास 39 हजार सक्रीय रूग्ण आहे. हीच संख्या 15 दिवसांपूर्वी 55 हजारांच्या पुढे होती. शहर,पिंपरी-चिंचवड, ग्रामीण अशी मिळून लाखभर संख्या दाखविण्यात आली असावी, असेही महापौर म्हणाले.
परिस्थिती नियंत्रणात असून, आता सर्व माहिती घेऊन मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार आहे. पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन लागणार, अशी चर्चा सुरू झाली.यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याने आम्ही न्यायालयात आमची बाजू मांडू संपूर्ण लॉकडाऊनची लावण्याची आवश्यकता नसल्याचेही महापौर मोहोळ यांनी सांगितले.
