अहमदनगर – हमाल-मापाडी यांच्या हक्कासाठी लढून त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी स्व.शंकरराव घुले यांनी आपले आयुष्य समर्पण केले. त्यांनी उभारलेल्या लढ्यामुळे हमाल-मापाडी यांचे अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्‍न सुटले. हमालांच्या पाठिवरील ओझे कमी करण्यासाठीचा लढा हा राज्याला दिशादर्शक ठरला.

हमाल व त्यांच्या कुटूंबियांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी हॉस्पिटलाची उभारणी करुन त्यांची नियमित तपासणी, त्याचबरोबर त्यांच्या आर्थिक उन्नत्तीसाठी पतसंस्था, विमा संरक्षण, हमालांच्या पाल्यांना प्रोत्साहन अशा विविध उपाययोजना स्व.शंकरराव घुले यांनी निर्माण करुन हमालांना स्थैर्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हमाल-मापाडी यांच्या उन्नत्तीसाठी केले कार्य कोणीही विसरुन शकत नाही.

त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेल्या आपला कामाचा ठसा आजही कायम आहे. त्यांनी सुरु केलेल्या सत्कार्यात व दाखविलेल्या मार्गाने जाऊन त्यांचा वारसा पुढे सुरु ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची त्यांची शिकवण आपण कायम आचरणात आणू. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच क्षेत्रावर विपरित परिणाम झाला आहे. त्यात हमाल-मापाडी हेही अडचणीत सापडलेले आहेत.

अशा परिस्थितीत हमाल पंचायत त्यांच्यामागे खंबीरपणे उभी असून, सर्वतोपरि मदत करण्यात येत आहे. हमालांचे लसीकरण व्हावे, त्यांचा आरोग्य विमा उतरविण्यात यावा, हॉस्पिटल, कोविड सेंटरमध्ये राखीव जागा ठेवाव्यात याबाबत आपण सर्वस्तरावर पाठपुरावा करत आहोत, असे प्रतिपादन जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी केले.

 जिल्हा हमाल पंचायतीच्यावतीने हमाल-मापाडी नेते स्व.शंकरराव घुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त मार्केट यार्ड येथील हमाल पंचायत येथे त्यांच्या प्रतिमेस जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष गोविंद  सांगळे, सचिव मधुकर केकाण, शहर बँकेचे संचालक संजय घुले, डॉ.विलास कवळे, तबाजी कार्ले आदि उपस्थित होते.

याप्रसंगी गोविंद  सांगळे म्हणाले, स्व.शंकरराव घुले यांचे हमाल-मापाडी यांच्यासाठी असलेली तळमळ व केलेले कार्य अविस्मरणीय असेच आहे. त्यांच्या लढ्यामुळे आज हमालांना त्यांचे हक्क मिळाले आहेत. त्यामुळे त्यांचे प्रगती होत आहे. त्याचे श्रेय स्व.शंकरराव घुले यांनाच जाते. त्यांचे सर्वच क्षेत्रातील योगदान न विसरता येण्यासारखे आहे, असे सांगून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर लॉकडाऊन असल्याने मोजक्याच पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. यावेळी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. शेवटी मधुकर केकाण यांनी आभार मानले.