छाया : अमीर सय्यद

अहमदनगर : बेकायदेशीररित्या लपवून ठेवलेला दारूसाठा तोफखाना पोलिसांनी जप्त केला आहे. 47 हजार 424 रूपयांचे संजीवनी देशी दारूचे 19 बॉक्स पोलिसांनी जप्त केले आहेत. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात पोकॉ. एस. यु. गोमसाळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवा गोपाळ शर्मा (वय 25, रा श्रमिकनगर, अहमदनगर) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

राज्यात विक्रीस प्रतिबंध असताना नगर शहरात भिस्तबाग चौकातील वृद्धेश्वर पान स्टॉल येथे देशी दारूचा साठा लपवून ठेवल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी सापळा लावून आरोपी शिवा शर्मा याला ताब्यात घेवून त्याच्याकडून 47 हजार 424 रूपयांची संजीवनी देशी दारूचे 19 सिलबंद बॉक्स जप्त केले. 

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या सूचनांप्रमाणे सहाय्यक पोलिस निरीक्षक पिंगळे, सहाय्यक फौजदार आढाव, पोहेकॉ. व्ही. बी. काळे, पोकॉ. शैलेश गोमसाळे, जावेद शेख, संतोष राठोड, नरसाळे यांच्या पथकाने केली.