मुंबई: ‘पंतप्रधान मोदी हे स्वत:चा फोटो छापण्याच्या शर्यतीत बरेच पुढं निघून गेले आहेत. असंच सुरू राहिल्यास एक दिवस भारतीय चलनी नोटांवरील महात्मा गांधी यांचा फोटो काढून मोदी स्वत:चा फोटो लावतील,’ अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.तृणमूल काँग्रेसनं करोना लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदीं यांच्या फोटोला आक्षेप घेतला होता. हे आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन असल्याची तक्रार तृणमूलनं निवडणूक आयोगाकडं करण्यात आली होती. त्याची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगानं लसीकरण प्रमाणपत्रावरील फोटो काढण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य खात्याला दिले आहेत. याच विषयाला धरून नवाब मलिक यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.’फोटो छापण्याच्या शर्यतीत पंतप्रधान मोदी खूपच पुढं निघून गेले आहेत. देशातील जवळपास सर्वच पेट्रोल पंप, रेल्वे स्थानके, विमानतळांवर मोदींची छायाचित्रं दिसतात. खादीच्या कॅलेंडरवरही गांधीजींच्या फोटोऐवजी मोदींनी स्वत:चा फोटो छापला आहे. आता लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर देखील मोदी दिसत आहेत. हे असंच सुरू राहिलं तर लवकरच चलनी नोटांवरही मोदीचे फोटो दिसतील,’ असं मलिक यांनी म्हटलं आहे.