अमरावती, दि. 19 : विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. फेब्रुवारी महिन्यात तर कोरोना संक्रमण अधिक झाल्याचे आढळून आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सदर जिल्ह्यातील ज्या भागात रुग्णसंख्या जास्त आढळून येत आहे तेथे कंटेनमेंट झोन जाहीर करुन कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आज दिले. नागरीकांव्दारे मास्क लावणे, सामाजिक अंतर व र्निजंतूकीकरण या कोरोना त्रीसुत्रीचे काटेकोर पालन होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, असेही त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात आज (दि.19 फेब्रुवारी) विभागांतर्गत अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम या पाचही जिल्ह्यांत वाढलेली कोरोना रुग्णसंख्या, आरोग्य व महसूल विभागाने प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेले नियोजन व प्रतिबंधात्मक उपाययोजना या संदर्भात श्री. म्हैसेकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त पियूष सिंह, पोलीस आयुक्त आरती सिंह, अमरावती जिल्हाधिकारी शैलेश नवाल, अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, बुलडाण्याचे जिल्हाधिकारी एस. राममुर्ती, वाशिमचे जिल्हाधिकारी षण्मुखराजन एस., मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले आदी यावेळी उपस्थित होते.

श्री.म्हैसेकर म्हणाले की, अमरावती जिल्ह्यातील अचलपुर तालुका, अमरावती महापालिका  क्षेत्र, यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, पुसद आणि पांढरकवढा नगरपरिषद क्षेत्र आणि अकोला जिल्ह्यातील अकोट व मुर्तीजापूर तालुका आणि अकोला महापालिका क्षेत्र या भागामध्ये कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आढळून येत आहेत. या भागातील संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे सर्व क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करुन बाधित कुटूंबातील व्यक्तींची व कोरोनाचे लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींची कोरोना चाचणी करावी. ज्या परिसरात अधिक रुग्ण संख्या आढळून येत आहे, त्याठिकाणी चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. कटेंनमेंट झोनसह जिल्ह्यात गर्दी टाळण्यासाठी महसूल व पोलीस विभागाव्दारे दंडात्मक कार्यवाहीसह प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.अकोला जिल्ह्याचा कोरोना रुग्ण संख्येचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर हा 32 टक्के असून आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर 24 टक्के आहे. अमरावती जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 48 टक्के असून आठवड्याचा 35 टक्के आहे तर यवतमाळ जिल्ह्याचा दैनंदिन आणि आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर 15 टक्के आहे. विभागातील पाचही जिल्ह्याच्या कोरोना रुग्णसंख्या व प्रशासनाव्दारे करण्यात नियोजनाचा आढावा घेताना ते म्हणाले की, जिल्ह्यात मनपा क्षेत्रातील ज्या प्रभागामध्ये तसेच ग्रामीण भागात ज्या तालुक्यात रुग्णवाढीचे व रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे अशा ठिकाणी प्रशासनाने अधिक दक्षता घेऊन कोरोना चाचण्या,  लसीकरण, घरोघरी जाऊन सर्वेक्षण, क्वॉटक्ट ट्रेसिंग आदींचे नियोजन करुन उपाययोजना करावे.

आरोग्य कर्मचाऱ्यासह फ्रन्टलाईन कर्मचाऱ्यांचे पूर्णपणे लसीकरण करावे, कोणीही लसीकरणापासून सुटू नये. पहिला डोज घेतल्यानंतर न चुकता दुसरा डोस देण्यात यावा. प्रत्येकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करावे.  निगेटीव्ह रिपोर्ट आलेल्या व्यक्तींच्या हालचालीवर प्रतिबंध करा. गृहविलगीकरणात असणाऱ्या व्यक्ती तसेच त्यांच्या कुटूंबीयांची आरटीपीसीआर पुन्हा चाचणी त्यांच्यावर आरोग्य कर्मचाऱ्यातर्फे देखरेख ठेवा. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या घरावर फलक व बॅरीकेटींग करुन परिसरातील नागरीकांच्याही तपासणी करा. कोविड पॉझिटिव्ह आढळून आल्यावर तत्काळ कोविड रुग्णालयात भरती करा, असेही श्री. म्हैसेकर यांनी यावेळी सांगितले.सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवावे. एका रुग्णामागे किमान 20 ते 30 निकट सहवासितांची तपासणी करुन चाचण्यांचे प्रमाण वाढवावे आणि पॉझिटिव्हिटि दर 10 टक्क्यांपेक्षा खाली आणावा. ज्या भागात नवीन रुग्ण आढळून येत आहेत त्यांच्या 20 पट अधिक चाचण्यांची संख्या वाढविण्याचे तसेच लक्षणे असलेल्या रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्याची सूचना देण्यात आली आहे. ज्या ठिकाणी सिटीस्कॅन चाचणी केली जाते तेथे कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्यास त्याबाबत जिल्हा प्रशासनाला माहिती कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. सुपर स्प्रेडरवर लक्ष केंद्रीत करुन त्यांच्यावर तत्काळ दंडात्मक व फौजदारी कार्यवाही करावी, असे विभागीय आयुक्त पियूष यांनी सांगितले.

सार्वजनिक ठिकाणी विशेषत: सार्वजनिक स्वच्छता गृह, बस आणि रेल्वे स्थानके अशा ठिकाणी निर्जंतूकीकरण स्थानिक प्रशासनाने करावे. सार्वजनिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये मर्यादित स्वरुपाची उपस्थिती आणि मास्कचा वापर, सुरक्षित अंतर राहील याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. सर्व आरोग्य यंत्रणांची दुरुस्ती करण्यात यावी. जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्या वाढत असून यंत्रणांनी अधिक सतर्क राहून प्रभावी उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.बैठकीत पाचही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाव्दारे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची प्रधान सल्लागार यांनी माहिती दिली.