जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकच दिवस शिल्लक राहिला आहे. तत्पूर्वी शुक्रवारी बँकेच्या निवडणुकीसाठी आ. निलेश लंके, आ. मोनिकाताई राजळे, माजी आमदार विजयराव औटी यांच्या पत्नी जयश्री औटी, जी एस महानगर बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, शिवाजी कर्डिले, पांडुरंग अभंग, अरुण तनपुरे, अण्णासाहेब म्हस्के यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी दिग्गज नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे बँकेची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे बोलले जात आहे. पारनेरमधून माजी आमदार विजयराव औटी यांच्या पत्नी जयश्री औटी यांनी अर्ज दाखल केला आहे. याच तालुक्यातून आमदार नीलेश लंके आणि उदय शेळके यांनी अर्ज दाखल केलेले आहेत. श्रीगोंद्याबरोबरच पारनेरमध्येही चुरशीची लढत होणार असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा बँक निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस आहे.

दरम्यान, माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी तालुक्यातील 109 मतदारांपैकी 100 मतदारांसमवेत शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माध्यमांशी बोलतांना कर्डिले यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. गेल्या दहा वर्षापासून बिनविरोध होणारी निवडणूक यंदा विरोधाला विरोध करणार्‍यांच्या आडुठेपणामुळे निवडणूक होवू शकते, असे ते म्हणाले. 100 पेक्षा जास्त मतदान आपल्याकडे असल्यामुळे विजय पक्का असून त्यांच्या विरोधाचा काहीही परिणाम होणार नाही. यावेळी सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, दिलीप भालसिंग यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.