नवी दिल्ली : (वृत्तसंस्था) शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत 4 जानेवारीला सरकारसोबत होणाऱ्या बैठकीत तोडगा न निघाल्यास हरियाणातील सर्व मॉल आणि पेट्रोल पंप बंद पाडण्यात येतील, असा इशारा शेतकरी संघटनांनी शुक्रवारी दिला. त्यानंतर आंदोलन तीव्र करण्यात येईल, असे आंदोलक नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आंदोलनस्थळी सिंधू सीमेवर पत्रकार परिषद झाली. कायदे रद्द करा आणि कृषी उत्पादनांना किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी द्या, अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत, असा पुनरुच्चारही नेत्यांनी यावेळी केला.

सरकारसोबत झालेल्या बैठकीवेळी संघटनेने उपस्थित केलेल्या प्रश्नांपैकी केवळ पाच टक्के मुद्द्यांवर चर्चा झाली आहे,असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.4 जानेवारीच्या बैठकीतही अंतिम तोडगा न निघाल्यास आम्ही हरियाणामधील सर्व मॉल, पेट्रोल पंप बंद पाडू, असा इशारा शेतकरी नेते विकास यांनी दिला. तसेच हरियाणा-राजस्थान सीमेवर शाहजहांपूर येथे आंदोलन करणारे शेतकरीही दिल्लीकडे कूच करतील, असे स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांनी सांगितले.

चर्चेत ठोस निर्णय न झाल्यास 6 जानेवारी रोजी ट्रॅक्टर मार्च काढण्यात येईल, असे युद्धवीर सिंह यांनी सांगितले. शेतकरी आंदोलन आणि सरकार यांच्या दरम्यान 4 जानेवारीला होणार्या बैठकीबाबत मी सकारात्मक आहे. या बैठकीत सकारात्मक तोडगा निघेल, अशी मला अपेक्षा आहे, असे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. मात्र, कायद्यांविरोधात चर्चेची ही सातवी फेरी अंतिम असेल की नाही, हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही, असेही तोमर म्हणाले.

कृषिमंत्री 4 जानेवारी रोजी होणारी चर्चा शेवटची असेल काय, असे विचारले असता ते म्हणाले की, त्यावर सध्या निश्चितपणे सांगू शकत नाही. मी काही ज्योतिषी नाही. मी बैठकीतील निर्णयाबाबत आशावादी आहे. शेतकरी संघटनांनी तीन शेतीविषयक कायदे रद्द करावेत, अशी प्रमुख मागणी लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर तोमर बोलत होते. पर्याय सुचविण्याचा प्रस्ताव सरकारने दिला आहे. त्याला नकार दिल्यास काय, असे विचारले असता तोमर यांनी आम्ही पाहू, एवढेच उत्तर दिले. कडाक्याच्या थंडीमुळे शेतकऱ्याचा मृत्यू केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात यूपी गेटवर सुरू असलेल्या धरणे आंदोलनात सहभागी असलेल्या बागपत जिल्ह्यातील भगवानपूर नांगल गावच्या गलतान सिंह या शेतकर्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. कडाक्याच्या थंडीमुळे गलतान सिंह यांची प्रकृती बिघडली होती.