
अहमदनगर – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस हा सावित्री उत्सव म्हणून साजरा होत आहे. या निमित्ताने विचारधारा व मातृसंघटना राष्ट्र सेवा दल व जिज्ञासा अकादमीच्या वतीने देण्यात येणारा सावित्री-फातिमा पुरस्कार शिक्षण क्षेत्रात समर्पित होऊन कार्य करणार्या छायाताई फिरोदिया, शारदाताई पोखरकर, सत्यभामाताई शिंदे, डॉ. निशातताई शेख, मनीषाताई बनकर यांना जाहीर झाल्याची माहिती सावित्री उत्सवाचे स्वागताध्यक्ष अविनाश घुले व विचारधाराचे अध्यक्ष विठ्ठल बुलबुले यांनी दिली.
पुरस्कारार्थी छायाताई फिरोदिया या अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह आहेत. हे पद त्या गेली अनेक वर्षे सक्षमपणे सांभाळीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेमध्ये अनेक नवनवीन उपक्रम राबविले जातात. आनंद विद्यालयाच्या मुख्याद्यापिका व राष्ट्र सेवा दलाच्या सक्रीय सभासद असलेल्या शारदाताई पोखरकर यांनी विद्यालयात नेहमीचे उपक्रम तर केलेच, त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी विविध विषयावर वेगवेगळे वक्ते बोलावून त्यांनी पौगंडा वयाच्या मुलांच्या मनातील अनेक प्रश्नांना उत्तरे मिळतील, असे पाहिले.
सत्यभामाताई शिंदे या नवनागपूर येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयात मुख्याद्यापिका म्हणून कार्यरत आहेत. अत्यंत शिस्तप्रिय प्रशासक म्हणून त्यांचा नामोल्लेख होतो. आसपासच्या शहरी, ग्रामीण मुलामुलींना शिक्षणासाठी जे जे उपलब्ध करून देता येईल, ते ते उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न त्या करतात.
डॉ. निशातताई शेख या यशवंत माध्यमिक विद्यालय मुकुंदनगर येथे ज्येष्ठ शिक्षिका आहेत. त्या मराठी माध्यमिक विभागामधून अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या डॉक्टरेट शिक्षिका आहेत. त्यांनी डॉ. शशिप्रभा शास्त्री के उपन्यासों का समीक्षात्मक अध्ययन या विषयावर पुणे विद्यापीठात 2007 साली आपला थिसिस सादर करून हा बहुमान मिळवला आहे.
मनीषाताई बनकर या महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीच्या सखाराम मेहेत्रे प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आहेत. प्राथमिक विद्यालयातील मुलामुलींना आनंदायी शिक्षण मिळावे म्हणून नवनवे प्रयोग त्यांनी केले. त्यांचे विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षा, स्पर्धा यात राज्यभर गाजलेले आहेत. ही पाच व्यक्तिमत्त्वे आपपल्या क्षेत्रात अत्यंत समर्पित भावनेने कार्यरत आहेत.
यांना पुरस्कार जाहीर करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे, असे यावेळी स्वागताध्यक्ष अविनाश घुले यांनी म्हणाले. येत्या 3 जानेवारी 2021 ला सावित्री उत्सवात या पुरस्काराचे वितरण प्रमुख अतिथींच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती जिज्ञासा अकादमीच्या संचालिक संगीता गाडेकर, पीयूष मंडलेचा, श्रीकांत वंगारी, शिवानी शिंगवी यांनी दिली.
