
अहमदनगर – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज.बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी बोठे याला स्वतः न्यायालयात हजर राहण्यास सांगावे,असा अर्ज पोलिसांनी सरकारी वकिलांमार्फत दिला होता. त्यावर आज (सोमवार) सकाळी व दुपारी सुनावणी झाली. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे.अटकपूर्व जामिनासाठी बोठे याने अॅड. महेश तवले यांच्यामार्फत 7 डिसेंबर रोजी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. यावर न्यायालयाने सरकारी पक्षाचे म्हणणे मागितले होते. त्यावर अभ्यास करण्यासाठी आरोपीच्या वकिलांकडून मुदत वाढवून मागण्यात आली होती. आज त्यावर सुनावणी झाली. सकाळच्या सत्रात सरकारी पक्षाने आजच निर्णय घ्यावा, असा युक्तिवाद केला.
दुपारच्या सत्रात बोठे याने न्यायालयात हजर राहावे की नाही, यावर निर्णय ठेवण्यात आला होता. तपासी अधिकारी उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील हे सुद्धा न्यायालयामध्ये हजर होते. आरोपीने न्यायालयात का हजर राहावे, याचे सक्षम कारण पोलिसांनी दिलेले नाही. त्यांना या प्रकरणामध्ये बोठेला अटकही करायची असेल, असा युक्तिवाद केला. बोठेला हजर करायचे असेल तर अटकेपासून संरक्षण द्यावे, असे म्हणणे अॅड. तवले यांनी मांडले. सरकारी वकील अॅड. सतीश पाटील यांनी जवळपास दहा मिनिटे युक्तिवाद केला. आरोपी बोठे याच्यावर दाखल असणारा गुन्हा गंभीर असून त्याने हजर राहणे गरजेचे आहे. कायद्यामध्ये तशी तरतूद असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
आरोपीला हजर ठेवण्याचे कारण सांगण्याची गरज नसल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी विविध न्यायालयांनी दिलेल्या निर्णयाचा दाखला दिला. त्यानंतर आरोपीच्या वतीने अॅड. तवले म्हणाले, न्यायालयात आरोपीला हजर करण्याचे कोणतेही ठोस कारण दिले नाही.केवळ गेटवर आरोपीला पकडण्यासाठी त्यांना आरोपी न्यायालयात हजर पाहिजे. इतर कोणतेही कारण त्यांच्याकडे नाही. त्यामुळे आरोपीला हजर ठेवायचे असेल तर त्याला अटकेपासून संरक्षण द्या, अशी विनंती केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखीव ठेवला. तो सायंकाळपर्यंत दिला जाणार आहे. 30 नोहेबर रोजी जरे यांची नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या झाली होती.
