अहमदनगर (दि २७ नोव्हेंबर २०२०) : विधी सेवा प्राधिकरणाची स्थापना व मुळ उद्देश भारतीय संविधानावरच झाली आहे. त्या आधारे मोफत विधी सेवा देण्याची तरतूद शासनाने करून कायदेशीर लढाई लढण्यासाठी ज्यांची परिस्थिती नाहीये अशांसाठी राष्ट्रीय, प्रादेशिक, जिल्हा व तालुका स्तरावर प्राधिकरण काम करत आहे. जेव्हा आपण आपले कर्त्यव्य करतो तेव्हाच आपल्याला हक्क मागता येतात. देशाच्या प्रगतीस हातभारासाठी आपल्या पासूनच संविधानाचा खरा उद्देश अमलात आणून सर्वांनी मुलभूत कर्त्यव्य पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मात्र तसे होतांना दिसत नाहीये. कोरोना पासून बचावासाठी मास्क वापरा, सामाजिक अंतर राखा, गर्दी टाळा असे वारंवार शासन सांगत आहे. मात्र आपण नियम पाळण्याचे कर्त्यव्य बजावत नाहीये. सर्वांनी नियमांचे पालन करून देशसेवा करावी,असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश रेवती देशपांडे यांनी केले.

भारतीय संविधान दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने #जिल्हा न्यायालयात प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कायदे विषयक जागृती शिबिराचे अयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थित वकिलांनी व न्यायिक कर्मचार्‍यांनी सामुहिकसंविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून संविधान आमलात आणण्याची शपथ घेतली.

दोन्ही वकील संघटनाच्या सहकार्याने झालेल्या या कार्यक्रमात न्यायाधीश रेवती देशपांडे यांनी संविधाना नुसार मोफत कायदे विषयक सहकार्य या विषयावर अध्यक्षस्थानहून मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, सेन्ट्रल बारचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष काकडे,शहर वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. भूषण बर्‍हाटे, जेष्ठ विधीज्ञ किशोर देशपांडे, प्राधिकरणाचे सदस्य अ‍ॅड. शिवाजी कराळे, अ‍ॅड. विक्रम वाडेकर, अ‍ॅड.प्रशांत मोरे, अ‍ॅड. दिपाली झांबरे, अ‍ॅड. लता वाघ, प्राधिकरणाचे अधिक्षक मोहन घावटे आदींसह विधी स्वयंसेवक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वकील संघटनेचे सहसचिव अ‍ॅड. योगेश गेरांगे यांनी केले.प्राधिकरणाचे वरिष्ठ लिपिक नरेंद्र देशमुख यांनी सुत्रसंचलन केले तर एन.आर. गनबोटे यांनी आभार मानले. कार्यक्रमच्या यशस्वितेसाठी प्राधिकरणाचे व न्यायालयाच्या कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.