अहमदनगर (दि १३ नोव्हेंबर २०२०) – इको युवान उपक्रम वंचित तरुणांना निश्‍चितच आत्मनिर्भर बनवेल, असा विश्वास प्रसिद्ध उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केला. श्रीमती आशा फिरोदिया आणि नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते युवान संचलित इको युवान या पर्यावरणपूरक वस्तू विक्री संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी फिरोदिया बोलत होते.

युवानद्वारे अनाथ वंचित तरुण आणि गरजू महिलांना रोजगार पुरवण्यासाठी ‘इको युवान’ हा उपक्रम मागील वर्षी सुरु करण्यात आला. कठीण प्रशिक्षण आणि जागा संसाधने अशा अनेक अडचणींवर मात करून प्रकल्पातून उत्पादन सुरु झाले, तोच लॉकडाऊन जाहीर झाला. त्यामुळे प्रकल्पास मोठा फटका बसला. तीन महिने राबून तयार केलेल्या वस्तूंची लॉकडाऊनमध्ये प्रत्यक्ष विक्री शक्य नसल्याने आणि इतर शैक्षणिक उपक्रम तात्पुरते थांबवावे लागल्याने प्रकल्पापुढे अनेक आव्हाने निर्माण झाली. परंतु संकटास संधी मानत आणि उपलब्ध संसाधनांचा वापर करत एक महिन्यात बॅग्सऐवजी कापडी मास्कचे उत्पादन ‘इको युवा’ मार्फत सुरु करण्यात आले.

केवळ नगर नाही तर नाशिक, मुंबई, पुणे येथून देखील प्रकल्पास लॉकडाऊन काळात मास्कच्या ऑर्डर्स मिळाल्या. त्यामुळे प्रशिक्षित तरुण बेरोजगारांच्या किमान दैनंदिन खर्चाचा प्रश्‍न मिटला.सामाजिक बांधिलकी म्हणून ‘इको युवान’ द्वारे 4000 पेक्षा अधिक कापडी मास्कचे पायी चालणारे मजूर, रेल्वे कर्मचारी, एस.टी.चालक-कर्मचारी, विविध अनाथ आश्रमातील बालकांना मोफत वितरण करण्यात आले.काळाची गरज लक्षात घेऊन युवान स्वयंसेवकांनी करोना संकटातून मार्ग काढण्यासाठी अद्यावत संकेतस्थळ निर्माण करण्याचे ठरवले.

विविध क्षेत्रातील तज्ञ स्वयंसेवकांच्या मदतीने http://www.ecoyuvan.com या नावाने हे संकेतस्थळ कालपासून कार्यरत झाले.आपल्या ‘इंडिया नेटवर्क’ मार्फत इको युवानसारखे 100 उद्योग घडविण्याचा मानस फिरोदिया यांनी यावेळी व्यक्त केला.