अहमदनगर (दि १३ नोव्हेंबर २०२०) : यंदा दीपावलीचा सण करोनाच्या सावटाखाली साजरा होत आहे. गेल्या आठ महिन्यांपासून सुरु झालेल्या महामारीने आरोग्याबाबतची जागरुकता अधोरेखित केली आहे. त्यामुळे सुदृढ आरोग्य हीच खरी संपत्ती बनली आहे. फिनिक्स फाऊंडेशनने या करोना काळातही नेत्र शिबिराच्या माध्यमातून गरजू- गरिबांच्या अंधकारमय जीवनात प्रकाश निर्माण करण्याचे काम केले आहे. त्यांचे हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. या कार्यातून समाजातील अंधांना दृष्टी मिळाल्याने त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा उपक्रमामुळे समाजातील दु:ख कमी होण्यास मदत होणार आहे.

अशा उपक्रमांची समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन युवा नेते अक्षय कर्डिले यांनी केले.फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने नागरदेवळे येथे आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी चाईल्ड लाईनचे हनिफ शेख, आनंदऋषीजी नेत्रालयाचे आनंद छाजेड, रामलाल पटवा, फिनिक्स फौंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, बाबासाहेब धीवर, अविनाश देडगांवकर आदी उपस्थित होते.

हनिफ शेख म्हणाले, शासनाच्या वतीने 6 ते 18 वर्षे वयोगटातील अनाथ मुला-मुलींसाठी संपूर्ण शिक्षण, निवास व इतरही सर्व जबाबदारी शासनाच्या वतीने घेण्यात येणार आहे. समाजातील अनाथ मुला-मुलींना याचा लाभ मिळवून देण्यासाठी सामाजिक संघटना, संस्थांनी पुढे यावे.याबाबत समाजकल्याण विभागाची संपर्क साधावा. नेत्रशिबिराच्या माध्यमातून गरजूंना होणारा लाभ व त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद हीच त्यांच्या कामाची पावती आहे.

याप्रसंगी जालिंदर बोरुडे म्हणाले, फिनिक्स फौंडशनच्या वतीने करोना काळातही शिबिरात खंड पडू न देता रुग्णसेवेचे व्रत सुरु ठेवले आहे. समाजातील गोरगरिबांना चांगली आरोग्य सेवा मिळावी, यासाठी फौंडेशनचे कार्य करत आहे. अंधांना हा प्रकाशाचा उत्सव पाहता यावा यासाठी दिपावलीनिमित्त मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेतले आहे.

या शिबिराच्या माध्यमातून अंधांना पुन्हा मिळालेली दृष्टी हेच मोठे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.या शिबिरात आनंदऋषीजीनेत्रालयाच्या वतीने 368 रुग्णांची तपासणी करण्यात आली तर मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी 74 रुग्णांची निवड करण्यात आली. तसेच 23 रुग्णांना अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले.शिबिर यशस्वीतेसाठी फिनिक्स फौंडेशनचे रोहन धाडगे, सौरभ बोरुडे, अक्षय धाडगे, गौरव बोरुडे आदींसह पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.