अहमदनगर (दि १२ नोव्हेंबर २०२०) – दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर मनपाचे कायम कर्मचारी पगार, सानुग्रह अनुदान, सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची पेन्शन,मानधनावरील कर्मचार्‍यांचा पगार उद्यापर्यत त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे तसेच नगरसेवकांचेही मानधन काढण्याचे आदेश मनपा स्थायी समितीच्या सभेमध्ये उपायुक्त व लेखापरिक्षक यांना देण्यात आले. सभेमध्ये कल्याण रोडवरील वसाहतीमधील पाणी प्रश्‍नासंदर्भात वादळी चर्चा झाली.

स्थायी समिती सभापती मनोज कोतकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी नगरसेवक शाम नळकांडे म्हणाले,शहरात दिवसाआड पाणी येते मग कल्याण रोडला 10 ते 12 दिवसांनी पाणी का दिले जाते.येत्या 10 दिवसात पाणी प्रश्‍न न सुटल्यास आयुक्तांच्या दालनात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा येईल. सभापती मनोज कोतकर यांनी पाणी पुरवठा अधिकारी रोहिदास सातपुते यांना पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा तसेच टँकरवरील चालक पैसे घेवून पाणी पुरवठा करण्यासंदर्भात कारवाई करण्यात यावी.

तसेच फेज-2 योजनेचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे अशा सूचना केल्या. तसेच यापुढील काळात कल्याण रोडचा पाणी प्रश्‍न कायम स्वरूपी सोडवावा,कायनेटीक चौक येथे पाण्याची टाकी, केडगांव व अरणगांव शिवारात पाण्याची टाकी बायपास कांबळे मळा येथे जमिनी अंतर्गत पाण्याची टाकी उभारण्यासाठी कारवाई सुरू करावी, असे आदेश यावेळी सभापती मनोज कोतकर यांनी दिले.

यावेळी डॉ. सागर बोरूडे यांनी सांगितले की, मनपाची आर्थिक नुकसान होवू नये यासाठी लोकमान्य संस्थेकडून आलेल्या करारनाम्यात वीज बिल व पाणी मोफत मिळावे व इमारतीचे कोणतेही भाडे संस्थेला आकारू नये या अटी असल्यामुळे ही निविदा मंजूर करू नये.

नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणाले, मनपाच्या हलगर्जीपणामुळे एमआरआय मशिन धुळखात पडून होती. गणेश भोसले, शाम नळकांडे यांनी मनपाचे नुकसान होत असेल तर ही निविदा मंजूर करू नये असे सभापतीच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सभापती यांनी आदेश दिला की, एक महिन्याच्या आत मशिनकरिता आवश्यक असणारे बांधकाम पूर्ण करून मशिन सुरू करावी व एक एमआरआय प्रिंट काढून योग्य असल्याची खात्री करून मनपाने बिल अदा करावयाची कार्यवाही करावी.