
अहमदनगर (दि ९ नोव्हेंबर २०२०) : पहाटेच्या बोच-या थंडीत कापूवाडी तलावाचे परिसरात आज शंभर – सव्वाशे नगरकर एकत्र जमले. कारण होते महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या पहिल्या पक्षी सप्ताहाचे. 5 ते 12 नोव्हेंबर हा आठवडा पक्षी सप्ताह म्हणून संपन्न करण्यात यावा असा अध्यादेश महाराष्ट्र शासनाने पंधरा दिवसापूर्वीच जारी केला. याच सप्ताहाचे औचित्य साधून अहमदनगरच्या निसर्ग मित्र मंडळ आणि स्वागत अहमदनगर या संस्थांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.सकाळी 6 ची वेळ कापुरवाडी तलावातील पाण्यावरची धुक्याची चादर हळुहळू अस्पष्ट होत होती आणि शेकडो लहान – लहान बदक दिसू लागली.
पुर्वे कडून सुर्यनारायण जस-जसा वर येवू लागला तस-तसा उपस्थ्त शेकडो निसर्गप्रेमींचा आनंद चेह-यावर स्पष्ट जाणवू लागला.बगळ्यांचे आणि लहान पाणकावळयांचे थवे डोक्यावरुन उडत जावून दिसेनासे झाले, तेव्हढ्यात कुणी तरी भोर-याचा थवा पाहिल्याचेही सांगितले. निसर्गप्रेमींच्या ओळखी नंतर स्वागत अहमदनगरचे इतिहास अभ्यासक भूषण देशमुख यांनी कापूरवाडी या ऐतिहासिक तलावाचे महत्त्व तेथील तत्कालिन पाणीयोजना, खापरी नळयोजना सलाबतखान महालाचे वैशिष्ठ्ये आणि इतिहास, ब-हानगरची बारव, देवी आदी विषयांवर उपस्थितांना अतिशय मोलाची अभ्यासपूर्ण माहिती दिली.
निसर्ग मित्र मंडळाचे संस्थापक पक्षी अभ्यासक डॉ. सुधाकर कु-हाडे यांनी अहमदनगर जिल्हयाचा ब्रिटीश काळापासूनचा निसर्ग इतिहास सांगितला. कापूरवाडी तलाव आणि परिसरात सहज दिसणाच्या स्थानिक आणी स्थलांतरीत पक्ष्यांविषयी, त्यांच्या वर्तणुकीविषयी माहिती देवुन सर्वांनी शांततेत आणि सोशल डिस्टंसिंग पाळत पक्षी निरिक्षणाचा आनंद घ्यावा असे आवाहन करण्यात आले. आजच्या पक्षी निरिक्षणात वेडा राघू, खंडया, शिंजीर, कवड्या होला, पारवा, टिटवी, बुलबुल या पक्ष्यांसह पाणडूबी बदक,चांदवा, लालसरी यासह लडाखहून स्थलांतर करून आलेले चक्रवाक बदक मोठया संख्येत दिसून आले.
गाय बगळे, वंचक, शराटी यांचे सोबतच दलदल ससाणाही उपस्थितांना सुखावुन गेला. परतीच्या मार्गावर पावश्या या पक्ष्याच्या जोडीनेही दर्शन दिल्याने कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली. या कार्यक्रमास शासकीय अधिकारी, डॉक्टर्स, व्यावसायीक, इंजिनीअर, चित्रकार विद्यार्थी, शहरातील नागरीक इ. विविध क्षेत्रातील निसर्गप्रेमी, इतिहासप्रेमी सहभागी झाले होते. पक्षी अभ्यासक निसर्ग अभ्यासक बहिरनाथ वाकळे यांनी उपास्थितांचे आभार मानले.
