मुंबई : बॉलीवूड अभिनेता सुशांत आत्महत्येपासून सुरु झालेले प्रकरण तपास आणि बॉलीवूड मधील काही कलाकारांच्या ड्रग कनेक्शन पर्यंत मोठे वादळ निर्माण झाले आणि झालेल्या वादावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिल्यांदाच भूमिका व्यक्त केली आहे. जाणीवपूर्वक बॉलिवूडला बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी खडसावल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या बॉलीवूड वादात उडी घेतली आहे. अमेय खोपकर यांनी ट्विटरवरुन तंत्रज्ञ आणि कलाकारांना धीर दिला आहे.“भूतकाळातही बॉलिवूडमधील कलाकारांना गंभीर गुन्ह्याखाली अटक झाली, त्यांना शिक्षा झाल्या, पण म्हणून कुणीही पूर्ण बॉलिवूडलाच खलनायक ठरवलं नाही. आता मात्र जाणीवपूर्वक बॉलिवूडलाच बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे. एवढंच नाही, तर फिल्मसिटीच मुंबईबाहेर हलवायचं कुटील कारस्थान रचलं जात आहे”

“महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही असली कारस्थानं कधीही यशस्वी होऊ देणार नाही. तंत्रज्ञांपासून कलाकारांपर्यंत कुणीही घाबरायची गरज नाही, कारण राजसाहेबांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि यापुढेही राहणार, हा आमचा शब्द आहे” अशी हमी खोपकर यांनी ट्विटरवरुन दिली.