राज्य सरकारनं एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या या निर्णयावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. “एमपीएससी परीक्षांवर तोडगा काढता आला असता. मात्र ही परीक्षा रद्द करताना सरकारनं एकाच जातीचा विचार केला आहे. उर्वरित ८५ टक्के जनतेचं काय?” असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर पोलीस भरती पाठोपाठ एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली होती. मराठा संघटनांनी ही मागणी केली होती. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे भाजपाचे राज्य सभेतील खासदार कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी एमपीएससी परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आंदोलनाचा व ‘वेळ आल्यास तलवारी काढू’, असा इशारा दिला होता.“मला जे बोलायचे ते मी बोलतो. एका जातीचं राजकारण चालणार नाही. कोणत्या प्रश्नांवर बोलायचे हे आम्ही ठरवितो. त्यामुळे टीका करणाऱ्यांनी आपलं चारित्र बघावं आणि नंतर टीका करावी,” अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.