बैठकीत बोलताना आ. संग्राम जगताप समवेत प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, ज्येष्ठ पत्रकार अँड. बाळ ज. बोठे पाटील, ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कुलकर्णी, सुधीर लंके, अण्णासाहेब मुनोत,जयंत येलूलकर

अहमदनगर : ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक वारसा जोपासून इतिहासाबरोबर देशामध्ये अहमदनगर शहर प्रगतशील करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अहमदनगर शहर विकासाबाबत नागरिकांना सोबत घेऊन शासनाला सर्वांगिण विकासाचा आराखडा सादर केला जाणार आहे. अहमदनगर शहर पर्यटन विकासाला चालना मिळावी, यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व राज्यमंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन निधीची मागणी केली आहे. या निधीसाठी शासनाकडे विकास आराखडा सादर करावयाचा आहे. विविध मान्यवरांकडून व पर्यटन प्रेमींकडून माहिती घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.

अहमदनगर शहर पर्यटन विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी आ. संग्राम जगताप व रसिक ग्रुपचे संस्थापक जयंत येलूलकर यांच्या पुढाकारातून निमंत्रित व्यक्तींच्या बैठकीत बोलताना आ. संग्राम जगताप समवेत प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, ज्येष्ठ पत्रकार अँड. बाळ ज. बोठे पाटील, ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कुलकर्णी, सुधीर लंके, अण्णासाहेब मुनोत, माणिकराव विधाते, गणेश भोसले, श्रीधर केळकर, रमेश जंगले, भूषण देशमुख, नाना बोज़ा,सलीम शेख,सीताराम काकडे, विशाल लाहोटी, संदीप जोशी, स्वप्नील मुनोत, पुष्कर तांबोळी, आदेश चंगेडिया, शारदा होशिंग, श्रीकांत मांढरे, आदी यावेळी उपस्थित होते.

आ. जगताप पुढे म्हणाले की, विकास कामे करीत असताना विविध अडचणींना व संकटाला सामोरे जावे लागते. शहराच्या विकासासाठी इच्छा शक्तीची गरज आहे. पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर विधानसभेत पहिला प्रश्न मांडला तो, सीना नदीवरील अतिक्रमण काढून हद्द निश्‍चितीचा आज ही दोन्ही कामेपूर्ण झाली. लवकरच सीना नदीचा विकास आराखडा तयार केला जाईल. महापौर असताना पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडून सीना नदीच्या सुशोभिकरणासाठी साडे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला होता. परंतु काहींनी ते काम बंद पाडले आणि तो निधी परत गेला.

अहमदनगर शहर हे स्वच्छ, सुंदर व हरित करण्यासाठी गेल्या 2 वर्षापूर्वी कचराकुंडीमुक्त शहर करण्याची संकल्पना केली होती.आज अहमदनगर शहरात कुठेही कचराकुंडी दिसणार नाही. आकाशवाणी केंद्र ते भिस्तबाग महाला पर्यंतचा रस्ता हा मॉडेल रस्ता करणार आहे. अहमदनगर शहरामध्ये पर्यटनाची चळवळ उभी करण्यासाठी जनजागृतीची आवश्यकता आहे. यासाठी सर्व नगरकरांना सामावून घेतले जाईल. भुईकोट किल्याला ऐतिहासिक वारसा आहे. या किल्ल्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची खरी गरज आहे. या किल्ल्याच्या पर्यटन विकास कामे करण्यामध्ये संरक्षण खात्याच्या विविध अडचणी येत असतात. हे सोडविण्यासाठी सर्वजण प्रयत्न करु असे ते म्हणाले.