
भाजपाच्या सोशल मीडिया रॅकेटसंदर्भात सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची भेट
मुंबई : भारतीय जनता पक्षाचा सोशल मीडियातील नवा दहशतवाद फोफावत आहे भाडोत्री आयटी सेलच्या माध्यमातून रातोरात ट्विटर, फेसबुकवर अकाऊंट उघडून बदनामी, अपप्रचाराची मोहीम राबवण्याचा उपद्व्याप सुरु आहेत. हा नवा दहशतवाद लोकशाही विरोधात रचलेला कटच आहे. या नव दहशतवादाचे समुळ उच्चाटन झाले पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भाजपाच्या सोशल मीडिया रॅकेटसंदर्भात आज मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची भेट घेतली. या बदनामी मोहिमेचा टविटरवरुन मिळालेला डेटा पुढील तपासासाठी पोलिसांकडे देण्यात आला आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये या कंपन्यांची नावं, सोशल मीडियावरील खरे आणि फेक अकाऊंटची माहिती आहे. याची चौकशी करु, असे आश्वासन पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिले आहे, असे सावंत म्हणाले.
“भाजपने सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांची बदनामी करण्याची, त्यांची प्रतिमा मलीन करण्याची मोहीम पद्धतशीरपणे चालवण्याचा नवा ट्रेंड आणला असून हा नव दहशतवाद आहे. याच माध्यमातून रातोरात हजारो ट्विटर, फेसबुक अकाऊंट उघडून बदनामीची मोहीम राबवली जाते. सुशांतसिंग राजपूत प्रकरणातही याच रॅकेटचा वापर करण्यात आला आहे. या ट्विटची वर्तनात्मक पद्धत, इतिहास, त्यांचे ट्विट व रिट्विट पाहिल्यास असे दिसते की महाराष्ट्र सरकार विरोधात विचारपूर्वक व नियोजित कट कारस्थान आहे”, असं सचिन सावंत म्हणाले.
