अहमदनगर (दि ०३ ऑक्टोबर २०२०) : कोरोना रुग्णांबरोबरच सारीचे रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळत आहेत.योग्यवेळी सारीच्या रुग्णांना उपचार मिळणे गरजेचे आहे. यासाठी साईनाथ कोविड सेंटरने अत्याधुनिक आयसीयू युनिटचे कोविड व सारी सेंटर सुरू करुन रुग्णांना दिलासा देण्याचे काम केले आहे. प्रत्येकाने मानवतेच्या भावनेतून कोरोना रुग्णांची सेवा करावी. कोरोना संसर्ग विषाणू असल्यामुळे नागरिकांत मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. अहमदनगर शहरासह जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या रोगाला थांबविण्यासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज आहे.

नागरिकांनी भीती न बाळगता आपल्या आरोग्याची तपासणी करुन उपचार घ्यावे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी नियमांचे व अटींचे पालन प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. यामध्ये प्रत्येकाने मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचे वापर करणे आवश्यक आहे. शहरामध्ये विविध सामाजिक संस्थांनी पुढे येऊन कोविड सेंटर सुरु केले आहे. लक्षण असणार्‍यांसाठी स्टेनशरोडवरील साईनाथ कोविड सेंटरच्यावतीने अत्याधुनिक साहित्याच्या सहाय्याने ऑक्सिजन, व्हेंटिलीटरचे 24 बेड असलेल्या सेंटरची व्यवस्था केली आहे. याची खरी गरज जाणवत होती, ती साईनाथ कोविड सेंटरने पूर्ण केली आहे.

कोरोनाच्या रुग्णांना ऑक्सिजनसाठी विविध हॉस्पिटलमध्ये फिरावे लागत आहे. यासाठी ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची खरी गरज आहे, ती या सेंटरने पूर्ण केली आहे. शहरातील विविध नामांकित डॉक्टरांनी एकत्र येऊन हे सेंटर सुरु केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले. स्टेशन रोडवरील 24 बेडचे साईनाथ कोविड व सारी सेंटरचे उद्घाटन आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी न्यूरो सर्जन डॉ. प्रशांत जाधव,डॉ. रोहित करांडे, डॉ. अजय साबळे,डॉ. वैभव कावळे, डॉ. रवींद्र हराळे,डॉ. तुषार कोहक, डॉ. बाळासाहेब गाडे, डॉ. गणेश गोपनर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना न्यूरोसर्जन डॉ.जाधव म्हणाले की, आम्ही सर्व डॉक्टर एकत्र येऊन सामाजिक भावनेतून साईनाथ कोविड व सारी सेंटर सुरु केले आहे. अत्याधुनिक सुविधांचे 14 बेडचे कोविड सेंटर सुरु करुन एक महिना झाला. 70 कोरोना रुग्णांना चांगल्या दर्जेची आरोग्य सेवा दिली. यामध्ये क्रिटीकल रुग्णांना कोरोनातून वाचविण्याचे काम केले. चांगल्या सेवेच्या विेशासावर नवीन 24 बेडचे कोविड व सारी सेंटर पुन्हा रुग्णांच्या सेवेत सुरु केले. सेवा देण्याच्या भावनेतून आम्ही काम करणार आहोत,असे ते म्हणाले.