अहमदनगर (दि ०३ ऑक्टोबर २०२०) : शेतकरी आणि कामगार यांच्याबाबत केंद्राने केलेल्या अन्यायकारक कायद्याच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्षाच्यावतीने राज्यभर मोहीम उघडण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या आदेशावरून अहमदनगरमध्ये शहरातील कामगारांच्या सह्यांच्या मोहिमेचा शुभारंभ आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोमवारी होणार असल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिली आहे.कामगारविरोधी कायद्यांमुळे कामगारांवर कुर्‍हाड कोसळली आहे.कामगार वर्गामध्ये या धोरणाबाबत नकारात्मक भावना आहे. त्यामुळे अहमदनगर शहरातील कामगारांचा आवाज बनत शहर जिल्हा काँग्रेस कामगारांच्या सह्यांचे निवेदन गोळा करून ते प्रदेश काँग्रेसच्या माध्यमातून केंद्र सरकारला पाठवणार असल्याचे काळे यांनी म्हटले आहे. सकाळी 11.30 वाजता अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये हा शुभारंभ होईल.त्यानंतर दुपारी 2.00 वाजता नगर तालुका, पारनेर, पाथर्डी व शेवगाव तालुक्याच्या तालुकाध्यक्ष, तसेच जिल्हा कार्यकारिणीच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक आ.तांबे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. या बैठकीमध्ये शेतकर्‍यांच्या सह्यांच्या मोहिमेचे नियोजन आ. तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांनी दिली आहे.