सातारा (दर्शक ऑनलाइन २८ सप्टेंबर २०२०) : चांगले मार्क्स मिळूनदेखील मराठा समाजातील तरुणांना प्रवेश मिळत नाही, तर दुसरीकडे कमी मार्क्स मिळूनही इतर समाजातील मुलांना प्रवेश मिळतो. समाजातील सर्व आरक्षण रद्द करा आणि सरसकट मेरिटनुसार आरक्षण द्या, अशी मागणी खा. उदयनराजे भोसले यांनी केली आहे. मराठा आरक्षण अंमलबजावणीस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे महाराष्ट्रात मराठा समाज आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर खा. उदयनराजे यांनी हे मोठे वक्तव्य केले आहे.खा. उदयनराजे यावेळी बोलताना म्हणाले की, मेरिटवर प्रवेश द्यावं आणि सगळेच आरक्षण रद्द करावं. ज्याने कष्टच घेतले नाही, त्याला आरक्षणामुळे प्रवेश मिळतो आणि ज्याने कष्ट घेतले ; पण आरक्षण नाही म्हणून त्यांना प्रवेश मिळत नाही. त्या तरुणांचं मानसिक दृष्ट्या खच्चीकरण होऊन पदरी नैराश्य येते. काहीजण आत्महत्यादेखील करतात, अशी खंतही उदयनराजे यांनी व्यक्त केली आहे.