
अहमदनगर | सध्या जगभरात नैसर्गिक आपत्तीने थैमान घातले आहे. मनुष्याची क्रयशक्ती कमी होत चालली आहे. आपण निसर्गापासून दूर गेल्यामुळे ही आपत्ती आपल्यात शिरु पाहत आहे. वृक्ष लागवड व त्या वृक्षांचे संवर्धन चळवळ आगामी काळात सर्वप्रकारच्या नैसर्गिक आपत्तींवर मात करेल असा ठाम विश्वास राज्याचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला.
कजबे वस्ती येथील पुण्यश्लोक नगरमध्ये वृक्ष लागवडीच्याप्रसंगी ना.दरेकर बोलत होते. यावेळी पुण्यश्लोक तरुण मंडळाचे अध्यक्ष निशांत दातीर, सचिव कुणाल जायकर, खजिनदार प्रा.चंद्रकांत वाव्हाळ, सहसचिव सुचित शिंदे, सचिन डफळ, अंकुश गावडे, राहुल कडूस, नितीन नजन, गणेश भोर, अमोल कुलकर्णी, विवेक कुलकर्णी, दिपक पाटील, अमोल काळे, आदिनाथ बर्डे, रेणुकादास ठोंबरे, प्रा.कुटे आदि उपस्थित होते.
पुढे बोलतांना ना.दरेकर म्हणाले, सध्या ग्लोबलायझेशनच्या जमान्यात मानव निसर्गापासून कोसो दूर चालला आहे. मात्र पुर्वीसारखे निसर्गाच्या सानिध्यात राहणार्यांचे आरोग्यही चांगले असायचे व आयुष्यमानही वाढलेले असत. आता पुन्हा खेड्याकडे चला आणि निसर्गाच्या सानिध्यात अधिक काळ राह तरच आपले आरोग्य निरोगी राहील, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. जगभरात कोरोना संसर्ग सुरु असल्यामुळे अनेक गोष्टींवर बंधने आली आहेत. मात्र शासनाचे नियम पाळत वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची चळवळ सर्वांनीच सुरु ठेवावी, असे आवाहन केले.
पुण्यश्लोक तरुण मंडळाच्यावतीने दरवर्षी वृक्षारोपणाची मोहिम राबविण्यात येत असते : निशांत दातीर
निशांत दातीर म्हणाले, पुण्यश्लोक तरुण मंडळाच्यावतीने दरवर्षी वृक्षारोपणाची मोहिम राबविण्यात येत असते. गेल्या दोन वर्षांपासून प्रकाश आंबेडकर, सिने अभिनेत्री दिपाली सय्यद, कोरोना योद्धा महिलाच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आहे. यासर्व वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी परिसरातील नागरिकांनी घेतली आहे. भविष्यात या भागाला ग्रीन पार्क बनविण्याचा मानस मंडळाच्या पदाधिकार्यांचा असून, यासाठी सर्वांचे सहकार्य लाभत आहे.
