
अहमदनगर । लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात सर्व व्यवहार, उद्योगधंदे सुरळीत होत असताना राज्य सरकारने विडी उत्पादन व विक्रीवरील निर्बंध उठवले नसल्याने लाखो विडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.विडी कामगारांच्या हाताला काम मिळण्यासाठी विडी विक्रीस परवानगी मिळावी तसेच औद्योगिक कामगारांचे लॉकडाऊन काळात बळजबरीने घेतलेले राजीनामे ग्राह्य न धरता त्यांना पुर्ववत कामावर हजर करुन लॉकडाऊन काळातील वेतन अदा करावे आणि कोठी येथील कै.दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केटमध्ये पुर्वीप्रमाणे फळ, फुले, भाजी-पाला बाजार भरविण्याच्या मागणीसाठी शनिवार दि.6 जून रोजी पत्रकार चौकातील शहीद भगतसिंह स्मारक येथे लालबावटा युनियन व इंटकच्या वतीने उपोषण करण्यात आले. दि.8 जून पर्यंत विडी कामगारांच्या हाताला काम न मिळाल्यास बुधवार दि.10 जून रोजी विडी कामगार शहरात भिक मागो आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.प्रारंभी भगतसिंह यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन उपोषणाची सुरुवात करण्यात आली. उपोषणात कॉ.शंकर न्यालपेल्ली, कॉ.महेबुब सय्यद,कॉ.बहिरनाथ वाकळे सहभागी झाले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करुन “भिक मागो” आंदोलन करणार : कॉ.न्यालपेल्ली
विडी कामगारांना हाताला काम मिळण्यासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री,राज्यमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन अर्ज करुन विडी विक्रीस परवानगी मिळण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र राज्य सरकार विडी कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून 80 दिवस उलटून देखील हाताला काम नसल्याने विडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. विडी कामगारांना शासनाने कोणत्याही प्रकारची मदत दिलेली नाही. शासनाने विडी कामगारांवर भिक मागण्याची वेळ आनली असून, शहरातील विडी कामगार तीन-तीन व्यक्तींचे ग्रुप करुन तोंडाला मास्क लावून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करुन भिक मागो आंदोलन करणार असल्याचे कॉ.न्यालपेल्ली यांनी सांगितले.
