अहमदनगर- सध्या सगळीकडे लॉकडाउनमुळे काम ठप्प झालेली असताना, अहमदनगरच्या कलावंतांच्या बाबतीत एक आनंदाची बातमी घडलेली आहे.स्टार प्रवाह या लोकप्रिय मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘फाईव स्टार किचन आयटीसी शेफ स्पेशल’ या मालिकेच्या डबिंगचे काम अहमदनगर मध्ये होत आहे. दर शनिवारी आणि रविवारी सकाळी नऊ ते साडेनऊ या वेळात हे भाग प्रसारित होत आहेत.अहमदनगर फिल्म फाउंडेशनच्या माध्यमातून अहमदनगरच्या कलावंतांसाठी विविध संधी उपलब्ध करून देण्याची कल्पना अहमदनगर मधील उद्योजक गौतम मुनोत यांनी मांडली होती. या अनुषंगाने संस्थेने केलेल्या प्रयत्नांना यश आले असून फाईव स्टार किचन या मालिकेचे डबिंगचे काम मुंबईतील निर्मिती संस्था क्लाऊड सेव्हन फिल्म मार्फत अहमदनगरमध्ये देण्यात आले आहे अशी माहिती संस्थेचे सचिव प्रशांत जठार यांनी दिली.

यामधील निवेदकाला आपल्या शहरातील प्रसिद्ध निवेदक आणि नाट्य सिनेकलावंत प्रा.प्रसाद बेडेकर यांचा आवाज

यामुळे आज अहमदनगरच्या अनेक कलाकारांना संधी मिळालेली आहे.प्रत्येक भागात दोन नवीन शेफ असून यासाठी लागणारे आवाज अहमदनगरचे कलाकार देत आहेत यामधील निवेदकाला आपल्या शहरातील प्रसिद्ध निवेदक आणि नाट्य सिनेकलावंत प्रा.प्रसाद बेडेकर यांचा आवाज वापरण्यात येत आहे तसेच श्री गणेश लिमकर,सायली जोशी, तन्मयी भावे, अपर्णा बालटे आदी कलाकारांनी आतापर्यंत डबिंग केले आहे. मुंबई पुण्याच्या दर्जाचेच काम नगर मध्ये देखील होऊ शकते हे या निमीत्ताने सिध्द झाले, असे या मालिकेसाठी डबिंग डिरेक्टर म्हणून काम पाहणारे विराज मुनोत यांनी सांगितले.अहमदनगरमधील साउंड इंजिनियर सारंग देशपांडे हे या मालिकेत तंत्रज्ञ म्हणून काम पाहत असून त्यांच्याच स्टुडिओध्ये हे काम केले जात आहे. तर क्षमा देशपांडे आणि सिद्धी कुलकर्णी या कोऑर्डिनेटर म्हणून काम पाहत आहेत.या प्रकल्पाबद्दल अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे शशिकांत नजन, नगरसेवक रविंद्र बारस्कर यांच्यासह विविध मान्यवरांकडून या कलाकारांचे कौतुक होत आहे.