अहमदनगर : शहरात किराणा, भाजीपाला व फळ विक्रीस परवानगी देण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते संजय झिंजे, शाकिर शेख व बहिरनाथ वाकळे यांनी आयुक्तांच्या निवासस्थानी आंदोलन केले. किराणा दुकान, फळ व भाजीपाला विक्रीवर असलेल्या निर्बंध उठविण्याबाबत शुक्रवारी (दि.28 मे रोजी) संध्याकाळी आयुक्त शंकर गोरे व उपायुक्त यशवंत डांगे यांच्यासह बैठक झाली.

निर्णय घेण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र संध्याकाळी बैठक होऊन देखील लेखी पत्र न मिळाल्याने सदरचे आंदोलन करण्यात आले. अत्यावश्यक वस्तूंवर घातलेले निर्बंध मागे घेण्यासाठी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

आयुक्तांशी चर्चा करुन आंदोलकांनी महापालिकेत जाऊन आस्थापना प्रमुख साबळे यांच्याकडून लेखी पत्र घेतले. या पत्रात दि.1 जूनच्या राज्य सरकारच्या निर्णयानूसार सदर प्रश्‍नी निर्णय घेण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे. शाकिर शेख म्हणाले की, महापालिकेच्या फतव्याचा गैरफायदा घेऊन अनेक किराणा दुकानदार मालाची चढ्या भावाने विक्री करुन काळाबाजार करीत आहे.

आयुक्तांनी बैठक घेऊन शहरातील किराणा दुकान, फळ व भाजीपाला विक्रीवर असलेल्या निर्बंधाबाबत दि.28 मे रोजी निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र त्यांनी आश्‍वासन पाळले नसल्याने नगरकरांची फसवणुक केल्याचा आरोप करुन सदरचे आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

संजय झिंजे यांनी कोरोना रुग्ण, वृध्द, लहान व गरोदर महिलांना फळ, भाजीपाला व सुकामेवा या खाद्य पदार्थाची आवश्यकता असते. मात्र या सर्व गोष्टींवर निर्बंध घालण्यात आल्याने सर्वसामान्यांना हे खाद्य पदार्थ मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. एक महिना अत्यावश्यक वस्तूंवर सरसकट बंदीचा फतवा अन्यायकारक असल्याचे त्यांनी सांगितले.

बहिरनाथ वाकळे यांनी शहरात दारु दुकानातून सर्रास विक्री होत असताना त्यांच्यावर कारवाई होत नाही. मात्र किराणा दुकानावर निर्बंध लादले जात आहे. इतर जिल्ह्यात किराणा, फळ, अंडी, मटन विक्री सुरु असून, अहमदनगर शहरातच वेगळ्या पध्दतीने निर्णय घेतले जात असल्याचा आरोप बहिरनाथ वाकळे यांनी केला.