अहमदनगर (२८ मे २०२१) : शहराचा इतिहास वैभवशाली आहे. त्याच्या आठवणी निश्चितच आनंददायी आहेत. इतिहासात अहमदनगर शहराची कैरो, बगदाद या शहरांशी जागतिक पातळीवर तुलना व्हायची. मात्र आता ती बिहारशी होते त्या वेळेला एक अहमदनगरकर म्हणून मनाला तीव्र वेदना होतात. वर्तमानातील अहमदनगर शहराची तुलना लंडन, शांघायशी नसली तरी किमान पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद अशा महाराष्ट्रातीलच आपल्या आसपासच्या शहरांशी होण्याच्या दृष्टीने विकासाचे व्हिजन ठेवून काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अहमदनगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.

अहमदनगर शहराच्या 531 व्या स्थापना दिनानिमित्त शहरातील 250 गरजू, गोरगरीब लोकांना काँग्रेस पक्षाच्या वतीने किराणा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी किरण काळे बोलत होते. यावेळी त्यांनी नागरिकांना शहराच्या स्थापना दिनाच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने शुभेच्छा दिल्या.  ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, क्रीडा शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप पाटोळे, क्रीडा काँग्रेस शहर जिल्हा सचिव मच्छिंद्र साळुंखे आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

किरण काळे म्हणाले की, आज अहमदनगर शहरातील एमायडिसी मधील उद्योगाला चालना देण्याची गरज आहे. यासाठी उद्योजकांना निर्भय वातावरण आणि राजकीय हस्तक्षेप होऊ नये यासाठी संरक्षण देण्याची आवश्यकता आहे. अहमदनगरची बाजारपेठ ही जुनी आहे. राजकीय स्वार्थासाठी वेठीस न धरता बाजारपेठेतील व्यापाराच्या वृद्धीसाठी व्यापारी बांधवांना विश्वासात घेत विकासात्मक पावले उचलण्याची गरज आहे. अहमदनगर शहरातील तरुण रोजगाराच्या शोधामध्ये आज पुणे, मुंबई अशा इतर शहरांमध्ये स्थलांतरित होत आहे. त्यांच्यासाठी अहमदनगर शहरातच रोजगार निर्माण केला पाहिजे.

अहमदनगर शहर ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना दिल्यास शहराचा नावलौकिक वाढू शकतो व शहराच्या उत्पन्नात देखील भर पडू शकते. भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राच्या नकाशावर मध्यवर्ती असणारे अहमदनगर शहर खर्‍या अर्थाने विकसित करण्यासाठी शहरातील तरुणाईला स्वतःच रस्त्यावरती उतरत चळवळ निर्माण करण्याची गरज आहे. अहमदनगर शहराच्या विकासासाठी तरुणाईची मोट बांधण्याचे काम काँग्रेस पक्ष मिशन म्हणून करत असून शहराच्या विकासाठी काँग्रेस चळवळ निर्माण करण्यासाठी काम करत असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे.

काळे पुढे म्हणाले की, आज अहमदनगर शहरामध्ये रस्ते, गटारी, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा अशा मूलभूत सुविधांवर अजूनही काम झालेले नाही. कोरोनामुळे मनपाचे साधे हॉस्पिटल सुध्दा नसल्यामुळे ऑक्सिजनसाठी नागरिकांना वणवण करावी लागल्यामुळे शहराचे भयाण वास्तव नगरकरांना अनुभवायला मिळाले. यातून बोध घेण्याची गरज आहे. अहमदनगर शहरामध्ये दरवर्षी पायाभूत सुविधांच्या विकासात्मक कामांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र या कामांच्या दर्जाकडे लक्ष देण्याची गरज आहे. आजची अहमदनगर शहराची दुरावस्था बदलण्यासाठी जागरूक होणे गरजेचे आहे. तोपर्यंत जुन्या आठवणींमध्ये रममाण होत अल्पकाळासाठी आनंदी राहणे योग्य नाही. असे काळे यांनी म्हटले आहे.