अहमदनगर । शहरातील नागरिकांसाठी मनपाने जंबो ऑक्सिजन कोविड सेंटर उभारावे यासाठी काँग्रेसने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली मनपात केलेल्या मुक्कामी आंदोलनानंतर मनपाला अखेर जाग आली आहे. 161 ऑक्सिजन बेडच्या उभारणीसाठी मनपाने निविदा मागविल्या आहेत. तसेच काँग्रेसच्या मागणी वरून मनपाने स्वतःच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीची प्रक्रिया देखील सुरू केली आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रुग्णांची ऑक्सिजन बेडसाठी होणार्‍या वेदनादायी फरफटीला वाचा फोडत महापालिकेमध्ये मुक्कामी आंदोलनाद्वारे नगरकरांची व्यथा मांडत काँग्रेसने महापालिकेला 1000 बेडचे जंबो ऑक्सिजन सेंटर उभारण्याची मागणी केली होती. मात्र मनपाकडून सुरुवातीला प्रतिसाद देण्यात आला नव्हता. 

पण अखेर काँग्रेसने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली नगरकरांसाठी ऐतिहासिक आंदोलन छेडत मनोज गुंदेचा, अनिस चुडीवाला, प्रवीण गीते यांच्यासह मुक्काम ठोकला होता. काँग्रेसचे अनंत गारदे, खलील सय्यद, फारुक शेख, अक्षय कुलट, रियाझ शेख हे देखील सहभागी झाले होते. मनपाने काळे यांच्यासह काँग्रेस आंदोलनकर्त्यावर गुन्हे देखील दाखल केले होते.दुसर्‍या दिवशी आयुक्तांनी काँग्रेसला या बाबतीत ठोस आश्वासन दिल्यानंतर काँग्रेसने आंदोलन स्थगित केले होते. 

अखेर या आंदोलनानंतर मनपा प्रशासन जागे झाले असून नगर शहरामध्ये पहिल्या टप्प्यात सुमारे 161 ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. शासकीय तंत्रनिकेतनला 60, आयुर्वेद महाविद्याल यात 27 जैन पितळे बोर्डिंग येथे 74 ऑक्सिजन बेड उभे करण्यात येणार आहेत. ऑक्सिजन बेडपर्यंत कॉपर धातूची लाईन बसवावी लागते. ही लाईन बसवण्यासाठी खासगी संस्थांकडून मागविण्यात आल्या आहेत. एका बेडसाठी सुमारे 14 हजार रुपये खर्च येणार असून ते काम खासगी संस्थेकडून करून घेतले जाणार आहेत. 

मनपामध्ये संगमनेर पॅटर्न 

आंदोलना वेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळाची उपायुक्त यशवंत डांगे यांच्या समवेत चर्चा सुरू असताना खडाजंगी झाली होती. यावेळी डांगे यांनी किरण काळे यांना नगर शहरामध्ये ऑक्सिजन कसा उपलब्ध करायचा ? हे तुम्हीच सांगा, आम्ही करू असा सवाल उपस्थित केला होता. याला काळे यांनी ना.बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर मध्ये कारखान्याच्यावतीने उभारण्यात येणारा स्व-ऑक्सिजन निर्मितीच्या प्लांटचा पॅटर्न मनपाने राबवावा असे सुचविले होते. अखेर मनपाने संगमनेर पॅटर्नचे अनुकरण करत मनपाचे यंत्र अभियंता परिमल निकम यांच्यावर मनपाच्या स्वतःचा ऑक्सीजन प्रकल्प उभारण्याची जबाबदारी सोपविली आहे. त्याबाबतची तयारी मनपाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. यावर काँग्रेसने देर से सही, दुरुस्त सही अशी प्रतिक्रिया देत मनपाचे स्वागत गेले आहे.