
मुंबई दि ११ मे २०२१ : भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आता ईडीनेही गुन्हा दाखल केलेला आहे. देशमुखांची आता ईडीकडून पुढील चौकशी होणार आहे. पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपावरुन त्यांच्यावर सीबीआय म्हणजेच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानेही गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्यानुसार सीबीआयने त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या विरोधात देशमुख यांनी उच्च न्यायालयात हा गुन्हा रद्द करण्याची मागणी केली होती. तसंच सीबीआयला कठोर कारवाई करण्यापासून मज्जाव करण्याचीही मागणी केली आहे.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने स्थगित केली आहे.महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्ट कारभाराचे आरोप करण्यात आले आहेत.
सचिन वाझे आणि संजय पाटील या पोलीस अधिकाऱ्यांना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, त्याचबरोबर अनेक अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या ते भ्रष्ट मार्गाने करत होते, असे आरोप अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वी अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या आणि सचिन वाझे आणि व्यापारी मनसुख हिरेन यांच्यातील जुने घनिष्ट संबंध आणि मैत्री त्यानंतर स्कॉर्पिओ मालक मनसुख हिरेन यांची हत्या या दोन्ही प्रकरणांवरून महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती.
