
अहमदनगर (दि ८ मे २०२१) : कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदीसह कडक निर्बंध लादले आहेत. आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पोलीस दल दिवसरात्र सेवेत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात देखील कर्तव्य पहिले, या उद्देशाने जिल्हा पोलीस दल काम करत आहेत. याच पोलिसांच्या कर्तव्याला सलाम करण्यासाठी ‘आय लव्ह नगर’च्यावतीने शहरात बंदोबस्तावर असणार्या पोलिसांना पौष्टिक आहार वाटप करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला.
अहमदनगर जिल्हा पोलीस दल, शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फाऊंडेशन, आय लव्ह नगर आणि हॉटेल आयरिस प्रिमीअरतर्फे हा उपक्रम सुरू करण्यात आला. शहरातील विविध ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना महिनाभर पौष्टिक आहार दिला जाणार आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, ‘आय लव्ह नगर’चे संस्थापक नरेंद्रजी फिरोदिया, शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे आणि हॉटेल आयरीसचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक नायर यांच्या उपस्थित हा कार्यक्रम झाला.

पोलीस अधीक्षक म्हणाले, कोरोना काळात योग्य आहार हेच चांगले औषध आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदीत कडक निर्बंध लादलेत. सतत बंदोबस्तावर असलेल्याने पोलीस अधिकारी, कर्मचारी हे आहाराकडे लक्ष देत नाही. त्यामुळे ‘आय लव्ह नगर’ने पुढाकार घेऊन बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसाठी सुरू केलेला पौष्टिक आहार हा उपक्रम कौतुकास्पद आहे.
‘गेल्या वर्षभरापासून प्रशासन, पोलीस, आरोग्य विभागातील कर्मचारी कोरोनाशी लढाई लढत आहेत. सर्वसामान्यांच्या सुरक्षितेसाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र सेवा देत आहे. या कठीण काळात पोलिसांचे मनोबळ वाढविण्यासाठी आय लव्ह नगर सतत प्रयत्नशील राहिल’, असे नरेंद्र फिरोदिया यांनी सांगितले. शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांनी ‘आय लव्ह नगर’च्या उपक्रमाचे कौतुक करून आभार मानले.
