
अहमदनगर : वाहन चालकांना अडवून लुटणारी टोळी गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत. विकास बाळू हनवत (वय 24, रा. कात्रड, ता. राहुरी), करण नवनाथ शेलार (वय 19, रा. मोरेचिंचोरे, ता. नेवासा) आणि एक अल्पवयीन साथीदार अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून चार दुचाक्या, दोन मोबाईल, रोख रक्कम असा एक लाख 73 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. 23 एप्रिल रोजी गोरक्षनाथ गडाच्या चढावर चार आरोपींनी रितीक छजलानी आणि त्यांच्या एका मित्राला मारहाण करून एक लाख 16 हजार 500 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला होता. यासंदर्भात एमआयडीसी पोलिस ठाण्यात रितीक प्रेमचंद छजलानी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा आरोपी विकास हनवत याने केल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपी हनवत याला राहुरी येथून ताब्यात घेतले.
आरोपी हनवत याच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने हा गुन्हा त्याचा साथीदार करण शेलार आणि सुरेश निकम यांच्यासह दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी शेलार आणि एक अल्पवयीन साथीदाराला अटक केली असून आरोपी निकम आणि एक अल्पवीयन साथीदार फरार आहेत. आरोपींनी चोरलेला मुद्देमाल आरोपी निकम याच्याकडे असल्याची माहिती दिली असून पोलिस निकम याचा शोध घेत आहेत.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या सूचनांप्रमाणे सहाय्यक निरीक्षक दिवटे, मिथून घुगे, उपनिरीक्षक गणेश इंगळे, सहाय्यक फौजदार नानेकर, हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, मनोज गोसावी, पोना. सुनील चव्हाण, संदीप पवार, सुरेश माळी, शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, दीपक शिंदे, रविकिरण सोनटक्के, ज्ञानेश्वर शिंदे, विशाल दळवी, पोकॉ. योगेश सातपुते, मच्छिंद्र बर्डे, मेघराज कोल्हे, कमलेश पाथरूड, सागर सुलाने, आकाश काळे, रोहित येमुल, मपोना. भाग्यश्री भिटे यांनी केली आहे.
