अहमदनगर- केंद्र सरकारच्या अमृत भुयारी गटार योजनेचे काम मध्य शहरांमध्ये संथ गतीने सुरू असल्यामुळे मंजूर असलेल्या रस्त्यांची कामे करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.यासाठी भुयारी गटार योजनेचे काम जलद गतीने मार्गी लावावे गेल्या अनेक दिवसांपासून मध्य शहरांमधील रस्त्याची दुरावस्था दैनी झाली आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यासाठी भुयारी गटार योजनेचे काम जलद गतीने मार्गी लावण्याचे आदेश प्रशासन व ठेकेदाराला देण्यात आले असल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी दिली.

अहमदनगर शहरामध्ये चालू असलेल्या अमृत भुयारी गटार योजनेच्या कामाची पहाणी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करताना स्थायी समिती सभापती अविनाश घुले,समवेत शहर अभियंता सुरेश इथापे,पाणीपुरवठा विभाग प्रमुख रोहिदास सातपुते,इंजि. श्रीकांत निंबाळकर, सोनू चौधरी व ठेकेदार आदी उपस्थित होते.

सभापती अविनाश घुले पुढे म्हणाले की, केंद्र सरकारच्या अमृत भुयारी गटार योजनेचे काम लवकरात लवकर मार्गी लागल्यानंतर उपनगरातील भुयारी गटार योजनेसाठी केंद्र सरकारकडून नवीन निधी प्राप्त होणार आहे यासाठी मध्य शहरांमध्ये सुरू असलेले भुयारी गटार योजनेचे काम मार्गी लागणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासन पातळीवर आम्ही पाठपुरवठा करत असून संबंधित ठेकेदाराला सूचना केल्या आहेत. भुयारी गटार योजनेचे काम मार्गी लागल्यानंतर मध्य शहरातील मंजूर असलेले रस्त्याचे कामे हाती घेण्यात येणार आहे असे ते म्हणाले.