
पुणे येथील ससून हॉस्पीटल आणि औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयाच्या धर्तीवर येथील सिव्हील हॉस्पीटलमध्ये सुविधा निर्माण करण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे आदेश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी येथे जिल्हा प्रशासनाला दिले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यास तातडीने मान्यता घेऊ, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती, त्यावरी उपाययोजना याचा आढावा मंत्री थोरात यांनी घेतला. यासाठी बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील ऑक्सिजनची उपलब्धता, त्याची प्रत्यक्षात असलेली गरज आदी बाबींवर यावेळी चर्चा झाली. नगर, संगमनेर, श्रीरामपूर, कर्जत आणि पाथर्डी येथे प्रत्येकी रोज सव्वा दोनशे जंबो सिलिंडर भरतील, एवढा ऑक्सिजन तयार करण्याच्या प्लँटचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कोविडविरोधात लढा देण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आमदार निधीतून एक कोटी रूपये खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यात विधानसभेचे बारा आणि दोन विधानपरिषद असे चौदा आमदार आहे. प्रत्येकाचे एक कोटी म्हणजे जिल्ह्यासाठी चौदा कोटी रूपये प्राप्त होणार आहेत.
यातून पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने तातडीने पाऊल उचलावीत, तसे नियोजन करावे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. नगर शहरासह जिल्ह्यात ‘संगमनेर पॅटर्न’ राबविण्याचे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले, संगमनेरमध्ये 28 टीम स्थापन केल्या आहेत. ते प्रत्येक भागात जाऊन सर्च करतात. जेथे संशयित रूग्ण आढळेल त्यांना लगेच कुटुंबापासून दूर ठेऊन तपासणी करण्यात येते. या प्रकारामुळे रूग्णांचा रोजचा आकडा घटू लागला आहे.
नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात फिरून हा प्रयोग करावा. रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजन याची टंचाई आहेच. राज्याचे ऑक्सिजनचे उत्पादन आणि सध्याची गरज यात मोठी तफावत आहे, हे मान्य करायलाच हवे. रूग्ण वाढ जास्त झाल्याने ही अडचण निर्माण झाली. ती फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर राजधानी असलेल्या दिल्लीमध्येही ऑक्सिजन न मिळाल्याने काही बळी गेले आहेत.
रेमडेसिविरबाबत प्रोटोकॉल पाळणे गरजेचे आहे. ज्यांना गरज आहे, त्यांनाच ते दिले जावे. स्कोर वाढू नये म्हणून प्रत्येकालाच ते हवे असले तरी आरोग्य विभागाने प्रोटोकॉल पाळणे महत्त्वाचे आहे. त्या इंजेक्शनमुळे काहीसा फरक पडत असला तरी त्याचे परिणामही गंभीर असल्याने प्रोटोकॉल पाळणे हेच महत्त्वाचे.
