अहमदनगर – अहमदनगर जिल्हा बँकेच्या विविध शाखेत अनेक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले असून, यामध्ये सात कर्मचार्‍यांचे निधन झाले आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बँकेच्या कामकाजाची वेळ बदलण्याच्या मागणीचे निवेदन कर्मचारी संचालक अशोक पवार यांनी जिल्हा बँकेचे चेअरमन अ‍ॅड. उदय शेळके यांना दिले आहेत.

अहमदनगर जिल्हा बँकेच्या 14 तालुक्यांतील शाखांत एकूण 154 कायम सेवक तर ठेकेदाराने नेमलेले 27 सेवक कोरोनाग्रस्त आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना, काही कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. काही कर्मचारी बरे झाले असून, काहींवर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

कोरोनाच्या महामारीत जिल्हा बँक जामखेड शाखेचे तीन,कोपरगाव शाखेचे दोन, पारनेर शाखेत एक तर मुख्य कार्यालयातील एक कर्मचारी असे एकूण सात कर्मचारी कोरोनाने मृत्यूमुखी पडले आहेत. लॉकडाऊनमुळे बँक व्यवहार कमी झाले असून, नागरिक कमी संख्येने येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

कोरोना परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बँकेच्या मुख्य कार्यालयासह सर्व शाखांच्या कामकाजाची वेळ कमी करावी, सेवकांना रोटेशन पध्दतीने काम करण्याची परवानगी देण्याची मागणी कर्मचारी संचालक पवार यांनी जिल्हा बँकेचे चेअरमन अ‍ॅड. उदय शेळके यांच्याकडे केली आहे.