अहमदनगर : करोनाच्या संकट काळात श्री बडीसाजन ओसवाल श्रीसंघाने मागील वर्षीही कोविड केअर सेंटर सुरु करून सर्वसामान्य रुग्णांना आधार दिला होता. नगरकर संकटकाळात कधीही हटत नाहीत, याही वर्षी आपले सामाजिक दायित्व जपत बडीसाजन ओसवाल संघाने हे कोविड केअर सेंटर सुरु करून रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. या संकटकाळात सर्वांनी या मदत कार्याला हातभार लावावा, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.

श्री बडीसाजन ओसवाल श्रीसंघाच्या आनंदऋषीजी हॉस्पिटल शेजारील महावीर सांस्कृतिक भवन येथे महापालिकेच्या सहकार्याने कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते व मनापा आयुक्त शंकर गोरे यांच्या प्रमुख उपस्तीतीत या कोविड सेंटरचे उद्घाटन झाले.

यावेळी बडीसाजन ओसवाल श्रीसंघाचे सचिव विशाल शेटीया, उपाध्यक्ष सुमतिलाल कोठारी,  खजिनदार मिलिंद जांगडा, सहसेक्रटरी अनिल लुंकड, संचालक धरमचंद कोठारी, अजित कर्नावट, दिनेश शिंगवी, नरेंद्र चोरडिया, दिपक बोथरा, सुशील भंडारी, नरेंद्र चोरडिया, रमण देसार्डा, उपायुक्त यशवंत डांगे आदि उपस्थित होते.

सचिव विशाल शेटिया म्हणाले, मागच्या वर्षाप्रमाणे याही वर्षी श्री बडीसाजन ओसवाल श्रीसंघ या संस्थेने पुढे येत कोविड केअर सेंटर सुरु करत प्रशासनाला मदत केली आहे. नगर शहरात वाढत असलेल्या करोनाचा प्रादुर्भावामुळे रुग्णांना आता हॉस्पिटलमध्ये जागा शिल्लक नसल्याने  रुग्णांना सर्व्वोत्तम व अधिक चांगली सेवा देण्यासाठी बडीसाजन संघाने केवळ दोन दिवसाच्या नियोजनात हे कोविड केअर सेंटर सुरु केले आहे.