अहमदनगर (१० एप्रिल २०२१) : राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर हत्या प्रकरणातील दोन आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. लाल्या उर्फ अर्जुन विक्रम माळी (वय 25, रा. एकलव्य वसाहत, राहुरी), तौफीक मुक्तार शेख (वय 21, रा. राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. मंगळवार दि. 6 एप्रिल रोजी दुपारच्या वेळी पत्रकार रोहिदास दातीर दुचाकीवरून जात असताना आरोपींनी त्यांचे अपहरण करून खून केला होता. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना स्वतंत्र पथक नेमण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी   दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि राहुरी पोलिस ठाण्याचे पथक असे दोन पथके स्थापन करण्यात आली होती.  आरोपींचा शोध घेत असताना पथकाला मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अर्जुन माळी आणि तौफीक शेख यांनी अपहरण करून दातीर यांचा खून केल्याचे समजले. आरोपींचा शोध घेऊन त्यांना राहुरी व नाशिक येथून ताब्यात घेण्यात आले. आरोपींनी हा गुन्हा त्यांचे साथीदार कान्हु मोरे आणि अक्षय कुलथे यांच्यासह केला असल्याची कबुली दिली आहे. आरोपींना राहुरी पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास राहुरी पोलिस करत आहेत.